आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकार केवळ घोषणाबहाद्दरच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - राज्यातील युतीचे सरकार हे केवळ घोषणाबहाद्दर सरकार आहे. आश्वासनांच्या पुढे हे सरकार जायला तयार नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी येथे केली.

विखे पाटील म्हणाले, ‘‘सहा महिन्यांत चौदाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आमच्या सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले होते. आम्ही दुष्काळ असो वा अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांना सहानुभूतिपूर्वक मदत केली; मात्र हे सरकार कोणतीही ठोस मदत द्यायला तयार नाही.

या वर्षी तर कापूस, सोयाबीन अशी ७० टक्के खरेदी केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. मात्र, सरकारला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. शेतकरी संघटनेचे आंदोलनही भरकटले आहे. या वर्षीची दुष्काळी स्थिती लक्षात घेता आमची अशी मागणी आहे, की ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची कर्जे सरकारने माफ करावीत.’

सरकार केवळ सवंग घोषणांच्या मागे
सरकार आणि सरकारातील मंत्री केवळ सवंग लोकप्रिय घोषणा करण्यातच धन्यता मानत आहेत. विनोद तावडे हे शिक्षणसम्राटांविरोधात धोरण राबवणार असल्याचे सांगत आहेत. मुळात सरकारच्या शिक्षणविषयक धोरणाबाबत पालकांमध्ये प्रचंड गोंधळ आहे. सरकारला काय करायचे आहे, हेच स्पष्ट होत नाही. कोणताही व्यवहार्य निर्णय शिक्षण विभागाने अद्याप घेतलेला नाही. टोलच्या बाबतीतही तेच आहे. टोलमाफी द्यायची तर ठेकेदारांना पैसे द्यायचे कोठून, याची सरकारने कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे टोलमुक्ती ही केवळ दिशाभूल असल्याची टीका त्यांनी या वेळी केली.