आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल - रुक्मिणी मंदिर- जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्मिणी देवस्थानच्या महाराष्ट्रासह परराज्यातील जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एक महसूल अधिकारी, एक वकील आणि एक साहाय्यक असे पथक तयार करण्यात येईल. लवकरच हे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी मंदिर समितीच्या बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी दिली. येथील तुकाराम भवनात दुपारी र्शी विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीची मासिक बैठक झाली. अध्यक्षस्थानी मंदिर समितीचे अध्यक्ष डांगे होते.
यात राज्यासह शेजारच्या कर्नाटक आणि इतर राज्यातून र्शी विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास दान म्हणून मिळालेल्या जमिनीचा शोध घेणे आणि शोध लागलेल्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करायला मंजुरी देण्यात आली. मंदिर समितीचे कामकाज अधिक गतिमान व्हावे यासाठी काही अनुभवी तज्ज्ञ लोकांची नियुक्ती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसेच आषाढी यात्रेपासूनच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्याचे ठरविण्यात आले. गणेशोत्सवावेळी गौरी आगमनानिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्याचे ठरले.
गणेश विसर्जनाच्या आदल्यादिवशी पंढरपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, फडकरी आणि वारकर्‍यांसाठी चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस समितीच्या सदस्यांसह मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी संजय तेली, व्यवस्थापक एस. एस. विभुते, समितीच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

गणेशोत्सवात विविध कार्यक्रम
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेशोत्सव काळात माध्यमिक ते महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या विषयांवर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. मुलांच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘समाज परिवर्तनाची दिशा’ तर मुलींसाठी ‘धर्मामधील स्त्रीचे स्थान’ असे विषय ठेवण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी दिली.
गणेशोत्सव काळात एक दिवस ख्यातनाम वक्त्यांचे व्याख्यान, एक दिवस करमणुकीचा, एक दिवस कथाकथनाचा आणि एक दिवस भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. नवरात्रोत्सवात पूर्वीप्रमाणेच संगीत महोत्सव तसेच कायदेशीर बाबींचा विचार करून गोकुळाष्टमीचा कार्यक्रमही विधीवत साजरा करण्यात येणार आहे.