आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज विठ्ठल मंदिरात पुरुषसूक्त पठण करणार - हिंदुत्ववादी संघटनांसह वारकरी, महाराज मंडळींचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या पूजेप्रसंगी पुरुषसूक्त म्हणण्यास आणि मूर्तीस रेश्मी वस्त्रे परिधान करण्यास श्रमिक मुक्ती दलाचे डॉ.भारत पाटणकर यांनी घेतलेल्या आक्षेपाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना, वारकरी, महाराज मंडळी आणि काही पत्रकारांनी सोमवारी रात्री येथील सावरकर वाचनालयात बैठक घेतली. वारकरी नसलेल्या प्रसिद्धीलोलूप मूठभर लोकांच्या आक्षेपावरून पुरुषसूक्त म्हणणे बंद केल्यास रोज मंदिरात शेकडो वारक-यांसह पुरुषसुक्ताचे पठण करण्याचा इशारा यात देण्यात आला.
देशात हजारो वर्षांपासून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व पुरुष देवतांच्या मंदिरात पूजेवेळी पुरुषसूक्त म्हटले जाते. ते वेदात आहे. त्यात जातीय काहीही नाही; परमेश्वराचेच वर्णन आहे. दरम्यान, याला संतांसह कोणीही आक्षेप घेतला नाही. एकनाथ महाराजांनी भागवतात पुरुषसूक्त पूजेवेळी म्हणावे, असे सांगितले आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदायाने कधीही याला विरोध केला नाही. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कायद्यानुसार मंदिरातील नित्योपचार, उत्सव, परंपरा यात कोणताही बदल करता येणार नाही. तसे झाल्यास त्याला विरोध करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. या वेळी काहीनी डॉ. पाटणकरांना पंढरपुरात येऊ न देण्याची भूमिका मांडली. तसेच त्यांचा केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.

फिरकू देणार नाही
विविध संतांचा आक्षेप असता तर त्यांनी त्यावेळीच घेतला असता.. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होऊ न देण्याची त्यांची भाषा असेल तर त्यांना फिरकू देणार नाही. अभयसिंह कुलकर्णी

वारकरी विरोध करतील
वारकरी सांप्रदाय हा श्री ज्ञानेश्वर, श्री तुकाराम, श्री संत नामदेवराय आदी विविध संतांच्या शिकवणीनुसार आचरण करीत आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणीबद्दल प्रत्येक वारकरी भाविकांच्या हृदयात मोठे स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक वारकरी डॉ. पाटणकरांच्या मागणीला विरोध करेल. ०वाघ महाराज