आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलाचे नित्योपचार बंद, आजपासून 24 तास दर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - आषाढी वारीनिमित्त भाविकांना श्री विठुरायाच्या दर्शनाकरिता बुधवारपासून (दि. 10) सर्व नित्योपचार बंद होणार आहेत. त्यामुळे 24 तास दर्शन होणार आहे. यावर्षी पदस्पर्श, मुखदर्शन तसेच ऑनलाइन व्यवस्थेद्वारे वारी काळात दररोज 70 ते 80 हजार भाविकांना दर्शन होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली.

आषाढी वारीकरिता श्री संतर्शेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालख्यांना आता सोलापूर जिल्हा प्रवेशाचे वेध लागलेले आहेत. वारी काळात गर्दीमुळे पालखी सोहळ्यातील भाविकांना विठुरायाचे दर्शन व्यवस्थित होत नाही. प्रत्येक भाविकाला विठुरायाचे दर्शन होण्यासाठी बुधवारपासून मंदिरातील सर्व नित्योपचार प्रक्षाळ पूजेपर्यंत म्हणजे 24 जुलैपर्यंत बंद करणार आहे. यंदा मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था नेहमीपेक्षा कडक असेही बेलदार यांनी सांगितले.

दर्शनासाठी नियोजन
बुधवारपासून भाविकांना 24 तास श्री विठ्ठल दर्शन होणार आहे. प्रक्षाळ पूजेपर्यंत म्हणजेच 24 जुलैपर्यंत मंदिरातील नित्योपचार बंद असतील. या वर्षी पदस्पर्श, मुखदर्शन तसेच भाविकांना ऑनलाइन दर्शन होणार आहे. मुखदर्शनासाठी तीन रांगा असतील.

20 हजार भाविकांनी केले ऑनलाइन बुकिंग
ऑनलाइन दर्शनाकरिता 20 हजार भाविकांनी बुकिंग केलेले आहे. याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी या वर्षी मंदिर समितीने खास उपक्रम हाती घेतलेले आहेत. पालख्यांमधून प्रचार आणि प्रसार करण्याचे काम सुरू असल्याचे बेलदार यांनी सांगितले.