आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीत विठ्ठल मंदिर सुरक्षेत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - बुद्धगया येथे झालेल्या बॉम्बस्फोट व आषाढीतील गर्दीच्या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. मंदिराच्या सर्व बाजूला जलद कृतिदलाचे कमांडो तैनात करण्यात आल्याची माहिती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांनी दिली.


श्री विठ्ठल मंदिराच्या आतील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी ही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे पाहिली जाते, तर मंदिरा बाहेरील सुरक्षेची सर्व जबाबदारी ही पोलिस प्रशासनाकडे आहे. त्यामुळे मंदिर समितीने मंदिरातील सुरक्षेसाठी सेवानिवृत्त लष्करी सैनिकांची नेमणूक केलेली आहे.


नुकत्याच झालेल्या बुद्धगया येथील साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेच्या सोहळ्यात येथील श्री विठ्ठल मंदिराला अतिरेक्यांकडून टार्गेट केले जाऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत मंगळवारी जलद कृतिदलाचे 20 कमांडो पथकाकडून सुरक्षेबाबत रंगीत तालीम घेण्यात आली. तसेच आषाढी यात्रेच्या काळात घ्यावयाच्या काळजीच्या सूचनाही देण्यात आल्या.


38 सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे मंदिर परिसरात निगराणी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने शहरात श्री विठ्ठल मंदिर, शिवाजी चौक, चौफाळा, श्री ज्ञानेश्वर दर्शन मंडप, दर्शन रांग आदी ठिकाणी आय. आर. बुलेट नावाने ओळखले जाणारे 38 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या शिवाय श्री विठ्ठल मंदिरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या अगदी बारीक-सारीक हालचालींवर नजर ठेवता यावी, यासाठी श्री विठ्ठल मंदिरावर तसेच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपावर पी.टी. झेड. नावाने परिचित असलेले पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली.