आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील मतदारसंख्या लाखाने वाढली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नुकत्याच पार पडलेल्या मतदार नोंदणी विशेष मोहिमेत जिल्ह्यात मतदारांची संख्या एक लाख 17 हजार 876 इतकी वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या आता 31 लाख 94 हजार 311 झाली आहे. येत्या 24 जानेवारीला मतदार दिवस साजरा होत असून, 21 जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नोव्हेंबर महिन्यात राज्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. 1 जानेवारी 2013 च्या अर्हतेवर प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत जिल्ह्यात एकूण एक लाख 17 हजार 876 मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. यामध्ये 64 हजार 982 पुरुष आणि 52 हजार 891 महिला मतदारांचा नव्याने समावेश झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 31 लाख 94 हजार 311 इतकी झाली आहे. यामध्ये 16 लाख 72 हजार 95 पुरुष आणि 15 लाख 22 हजार 216 महिला आहेत. पन्नास टक्क्यांच्या जवळपास महिला मतदार असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून शासनाने महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणही केलेले आहे.

24 जानेवारी हा मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. 21 ते 24 जानेवारी दरम्यान मतदार दिवस या विषयावर फेरी, रांगोळी, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार यादीत नव्याने समाविष्ट झालेल्या एक लाख 17 हजार 876 मतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटपही केले जाणार आहे.