आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संभ्रम:सोलापुरात मतदार याद्या वाचनात गोंधळ, मतदार संभ्रमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मतदार यादीतील दुबार, मयत, स्थलांतरित आणि निवासाच्या पत्यावर आढळून येत नसलेल्या मतदारांची नावे वगळण्यासाठी मंगळवारी प्रभागनिहाय मतदार याद्यांचे जाहीर वाचन झाले. परंतु त्यात मोठा गोंधळ झाल्याची तक्रार नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. 5, 7 आणि 14 येथील प्रभागांत चुकीच्या याद्या वाचल्याने मतदारच संभ्रमात पडले. संबंधित बूथच्या याद्याच पर्यवेक्षकांकडे नव्हत्या. त्यामुळे गोंधळात अधिक भर पडली.

प्रत्येक प्रभागात संबंधित नगरसेवकांच्या समक्ष मतदार याद्यांचे चावडी वाचन झाले. काही नगरसेवकांना त्याची कल्पना नव्हती. घाई-गडबडीने त्यांनी चावडी वाचनस्थळी धाव घेतली. वगळण्यात येणार्‍या नावांचे वाचन सुरू असताना, नगरसेवकांनी हस्तक्षेप केला. संबंधित नावांचे मतदार या प्रभागात मुळातच नव्हते. या याद्या कुठल्या याचा शोध घेतल्यानंतर याद्यांची अदलाबदल झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत प्रभाग क्रमांक सहामधील भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी लेखी तक्रार केली आहे.

यादी एका भागाची वाचली दुसर्‍या प्रभागात
प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र पर्यवेक्षक आणि बीएलओ यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांना प्रत्यक्ष प्रभागात जाऊन वगळण्यात येणार्‍या मतदारांच्या नावांचे वाचन करण्यास सांगण्याचे आदेश होते. परंतु त्यांनी संबंधित प्रभागात न वाचता, दुसर्‍याच प्रभागात वाचन केले. त्यामुळे खूप ठिकाणी असा गोंधळ झाला. त्याचे फेरवाचन करण्यात यावे. याबाबत संबंधित नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

नियोजनात गोंधळ नाही
शहरातील प्रभागनिहाय मतदार याद्या संबंधित पर्यवेक्षकांकडे दिलेल्या होत्या. दोन प्रभागांची जबाबदारी असणार्‍यांकडे अशा याद्या होत्या. संबंधित प्रभागाच्या याद्या पर्यवेक्षकांना देण्यात आल्या होत्या. त्याचे वाचन सुरू असतानाच दुरुस्ती करून घेण्यात आली. त्यामुळे गोंधळ झाला, नियोजन बिघडले असे म्हणता येणार नाही.
-अंजली मरोड, तहसीलदार, उत्तर सोलापूर.

नेमके काय झाले?
1 पर्यवेक्षक आणि बीएलओंनी याद्यांची नीट तपासणी केली नाही, चुकीच्या ठिकाणी चावडी वाचन केले
2 संबंधित प्रभागाच्या नगरसेवकापर्यंत निरोप मिळाला नाही, त्यामुळे घाई-गडबड, गोंधळ झाला
3 काही ठिकाणी बीएलओ आलेच नाहीत. त्यामुळे संबंधित प्रभागांतील चावडी वाचन पूर्ण झाले नाही.

काय अपेक्षित होते?
1 पर्यवेक्षक, बीएलओंनी प्रत्यक्ष प्रभागात जाऊन वगळण्यात येणार्‍या मतदारांची नावे वाचणे अपेक्षित होते
2 संबंधित प्रभागाची रचना, चावडी वाचनाचे स्थळ, त्याची प्रभागातील नागरिकांना माहिती देणे गरजेचे होते
3 प्रभागांचे नगरसेवक, माहीतगार व्यक्ती यांच्यासमवेत याद्यांचे चावडी वाचन होणे आवश्यकच होते