आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वळसंगचा लाचखोर हवालदार अटकेत; कारवाई टाळण्यासाठी मागितले 10 हजार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गुन्ह्यातील मोटारसायकल, अडीच तोळे सोन्याचे दागिने परत देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना वळसंग पोलिस ठाण्याचे हवालदार अविनाश शिंदे (वय 46) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी दोनच्या सुमाराला अटक केली. आसरा चौकातील हॉटेलात हा सापळा यशस्वी झाला. मारुती शिंदे (रा. सोरेगाव) यांनी तक्रार दिली होती.

शिंदे यांचे मेव्हणे बाळासाहेब रामराव देशमुख (रा. बंकलगी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे 18 एप्रिल रोजी शेजारी जैनबबी नदाफ यांच्यासोबत भांडण झाले होते. नदाफ यांच्या फिर्यादीवरून देशमुख व त्यांचा मुलगा, पुतण्यावर वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तिघांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि जप्त करण्यात आलेले अडीच तोळे सोन्याचे दागिने देण्यासाठी, मुलांना पोलिस रिमांड टाळण्यासाठी हवालदार शिंदे याने 20 हजार रुपयांची लाच मागितली. दहा हजार रुपयांवर तडजोड झाली. हवालदार शिंदे याने पाच हजार रुपये एक जून रोजी घेतले. उर्वरित रक्कम मंगळवारी देण्याचे ठरले होते. तत्पूर्वी देशमुख यांचे मेव्हणे मारुती शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आसरा चौकातील एका हॉटेलात पैसे देण्यासाठी त्याला बोलावून घेतले. मारुती शिंदे यांच्याकडून पैसे घेताना हवालदार शिंदे याला रंगेहाथ पकडण्यात आले. शिंदे हा वळसंग पोलिस ठाण्याअंतर्गत होटगी औटपोस्टमध्ये कार्यरत होता. या प्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक एम. एस. कुंभार, निरीक्षक सौ. संगीता हत्ती, हवालदार विवेक सांजेकर, दत्तात्रय गोडसे, राजमाने, प्रवीण बिराजदार, अरुण पंचवाघ, विजय पावले, सुनील चव्हाण, भोसले, गडदे, दामोदर गजघाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


अहवाल मागवला
हवालदार अविनाश शिंदे यांच्यावर कारवाईबाबत वळसंग विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांकडून अहवाल येईल. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक तुषार दोशी सांगितले.