आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्व धावले रिंगणी... अकलूज झाले विठ्ठलमय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा सीमेवर स्वागत स्वीकारल्यानंतर अकलूज येथे या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण झाले. ‘विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चारा॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ।। विठ्ठल सुखा विठ्ठल दु:खा. तुकया मुखा विठ्ठल ॥ या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. असा हा अगम्य सोहळा हजारो वारक-यांनी आपल्या डोळ्यांत साठवला.’ त्यानंतर ही पालखी मुक्कामासाठी अकलूज येथे विसावली.

सराटी (जि. पुणे) येथील मुक्काम आटोपून तुकोबारायांचा पालखी सोहळा शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता जिल्ह्यात अकलूज येथे आला. सीमेवर पालकमंत्री दिलीप सोपल, आमदार हनुमंत डोळस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस अधीक्षक मकरंद रानडे, मदनसिंह मोहिते, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब झेंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आदींनी पालखीचे स्वागत केले. येथील स्वागत स्वीकारून सकाळी साडेनऊ वाजता हा पालखी सोहळा अकलूज येथील गांधी चौकात आला. याठिकाणी खासदार विजयसिंह मोहिते, नंदिनीदेवी मोहिते, फत्तेसिंह माने, किशोरसिंह माने, पांडुरंग देशमुख, फातिमा पाटावाला, सरपंच शशिकला भरते, हंसाजी माने आदींनी स्वागत केले. त्यानंतर हा पालखी सोहळा विसाव्यासाठी व गोल रिंगणासाठी सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर गेला.

येथील मैदानावर सकाळी साडेदहा वाजता रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. पावसाने ओढ दिल्याने पालखी सोहळ्यामध्ये वारक-यांची गर्दी घटली असली तरी येथील गोल रिंगणावेळी भक्तिभाव ओसंडून वाहत होता.

रिंगणातून प्रथम पताका व झेंडेवाले धावले. त्यानंतर तुळस, हंडेवाले, विणेवाले यांचा धावा झाला. शेवटी रिंगणातून मानाचे अश्व धावले. सुरुवातीला बाभूळगावकर यांचा मानाचा अश्व धावला. त्यानंतर जयसिंह मोहिते यांच्या चेतक नावाच्या अश्वाने सुसाट वेगाने रिंगणात पाच फे-या पूर्ण केल्या. हा अश्व धावत असतानाचे रोमहर्षक दृष्य डोळ्यांत साठवण्यासाठी हजारो भक्तांचा जनसमुदाय धडपडत होता. अश्वांच्या टापांखालील माती मस्तकी लावण्यासाठी प्रयत्न करीत होते. रिंगणानंतर सर्वांनी पालखीचे दर्शन घेतले. खासदार मोहिते व जयसिंह मोहिते यांच्या हस्ते विश्वस्तांचा सन्मान झाला.

हेही धावले रिंगण सोहळ्यात
यंदाच्या रिंगण सोहळ्यात एक नवीन परंपरा जयसिंह मोहिते यांनी सुरू केली. यात पालखीच्या सर्व विश्वस्त, भालदार, चोपदार यांनी धावावे, ही त्यांची विनंती सर्वांनी मान्य केली. तसेच पालकमंत्री सोपल, जयसिंह मोहिते, आमदार डोळस, जिल्हाधिकारी डॉ. गेडाम, पोलिस अधीक्षक मकरंद रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी झेंडे हेही रिंगणातून धावले. या सर्वांनी रिंगणाची एक फेरी पूर्ण केली, हे याचे खास वैशिष्ट्य ठरले. याचे सोहळा विश्वस्तांनीही स्वागत केले.

माझ्यासाठी राम, रहिम एकच : रफिक तांबोळी
संत तुकोबांच्या रिंगण सोहळ्यात जयसिंह मोहिते यांचा चेतक हा अश्व धावला. या अश्वाचे सारथ्य मुस्लिम समाजातील रफिक तांबोळी यांनी केले. यामुळे सोहळ्यात सर्वधर्म समभावाची प्रचिती आली. मी मुस्लिम असतानाही मला हा मोठा मान मिळाला, याचे मी भाग्य समजतो. ही माझी पाचवी वारी आहे. मी रमजानचे रोजेही ठेवतो. कपाळी केशरी टिळा लावून रिंगण सोहळ्यात अश्वही पळवतो. त्यामुळे मला राम रहिम हे एकच असल्याचे वाटते, अशी प्रतिक्रिया रफिक तांबोळी यांनी दिली.
मोहितेंच्या भाऊबंदकीचे पुन्हा घडले दर्शन
रिंगण सोहळ्यात मोहिते कुटुंबातील भाऊबंदकीचा संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला. तुकोबांच्या रिंगण सोहळ्यात जयसिंह व प्रतापसिंह मोहिते यांचे अश्व धावतात. परंतु प्रतापसिंह मोहिते यांचा अश्व रिंगणात न धावताच निघून गेला. शेवटी जयसिंह यांच्या अश्वाबरोबर पालखी सोहळ्यातील मानाच्या बाभूळगावकरांचा अश्व पळवण्यात आला आणि रिंगण सोहळा पार पडला. याविषयी रिंगण सोहळ्यात मोठी कुजबूज सुरू होती. या घटनेसंदर्भात जयसिंह मोहिते व प्रतापसिंह मोहिते या दोघांनीही प्रसारमाध्यमांसमोर आपापल्या बाजू मांडल्या.
आता अश्व पाठवणार नाही
खासदार विजयसिंह मोहिते व जयसिंह मोहिते यांनी आकसापोटी माझा शिवराज नावाचा अश्व रिंगण सोहळ्यातून बाहेर काढला. माझ्या अश्वाला आणि घोडेस्वाराचा अपमानजनक वागणूक दिली. धार्मिक ठिकाणीही त्यांनी राजकारण आणले. मी गेल्या 30 वर्षांपासून पालखी सोहळ्यात अश्व पाठवतो. परंतु या पुढील काळात तो पाठवणार नाही.’’ प्रतापसिंह मोहिते, माजी मंत्री

वस्तुस्थिती विश्वस्तांना विचारा
आम्ही कोणाचाही अश्व बाहेर काढला नाही. उलट आम्ही त्या अश्वाला पूजेसाठी बोलावले होते. तरीही स्वाराने अश्वास बाहेर नेले. अनेकांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला, तरी ऐकले नाही. वारीतील रिंगणासारख्या पवित्र ठिकाणी असा दुजाभाव करण्याचे काहीच कारण नाही. या ठिकाणी नेमके काय घडले, याबाबत आपण पालखी सोहळ्यातील विश्वस्तांना विचारल्यास वस्तुस्थिती समजेल. ’’ जयसिंह मोहिते, अध्यक्ष, सहकार महर्षी