पंढरपूर - पावसाअभावी उन्हाची तीव्रता वाढत आहे. विठ्ठल मंदिर परिसरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने रस्त्यावर बारीक खडी पडली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अनवाणी प्रदक्षिणा घालताना खडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उन्हाचे चटकेही बसत आहेत. त्यामुळे भाविक संताप व्यक्त करत आहेत.
आषाढी यात्रेसाठी श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्यांसह लाखो भाविक येथे येतील. दिंड्या येथे पोहोचण्यापूर्वी दर्शनासाठी गर्दी होत आहे. मात्र, प्रशासनाने ऐन यात्रेच्या तोंडावर विविध विकासकामांना सुरुवात केली आहे. प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर,भक्तिमार्ग, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसरातील रस्त्यांच्या कामांमुळे भाविकांचे खूपच हाल होत आहेत. रस्तेकामासाठी टाकलेल्या खडीचा आणि उन्हामुळे त्याचे चटके बसत असल्याने अनवाणी भाविकांना त्रास होत आहे. त्यामुळे मंदिराभोवताली ‘मॅट’ अंथरावे, अशी मागणी होत आहे.
वर्षभर काय झोपा काढल्या
- आम्ही ज्ञानेश्वर पालखीसमवेत पायी चालत आहोत. रस्त्यात जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास इथे झाला. इथल्या अधिका-यांनी वर्षभर काय झोपा काढल्या. आता यात्रेच्या अगोदर रस्ते करत आहेत, हा कसला विकास आहे. त्यामुळे म्हात-याकोत-यांचे हाल होत आहेत. अधिका-यांनी अनवाणी या रस्त्यांवरून चालावे, मग त्यांना कळेल. मीराबाई पाटील, भाविक, (वय 65,) जळगाव
90 टक्के कामे पूर्ण
- शहरातील 90 टक्के रस्त्यांची कामे पूर्ण होत आली आहेत. कालिकादेवी चौक ते विप्रदत्त घाट तसेच एक-दोन घाटाच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यावर टाकलेली बारीक खडी काढण्यात येत आहे. लवकरच भाविकांची अडचण दूर होईल. संजय तेली, प्रांताधिकारी, पंढरपूर
फोटो - पंढरपूर येथे रस्त्यांच्या कामासाठी टाकलेल्या खडीचा अनवाणी भाविकांना त्रास होत आहे. तसेच उन्हामुळे चटके सहन करावे लागत आहेत. छाया : राजू बाबर