आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- शहरापासून 15 किलोमीटर दूर असलेल्या चिंचोळी औद्योगिक वसाहतीत सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी सक्तीची वर्गणी वसूल करत आहेत. जबरदस्तीने पावत्या देऊन धमक्या देत आहेत, अशी तक्रार नॉर्थ सोलापूर इंडस्ट्रियल असोसिएशनने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिसप्रमुखांकडे केली.
शहरातील काही उत्सव मंडळांचे कार्यकर्ते कारखान्यांमध्ये प्रवेश मिळवतात. हातात पावती देतात आणि म्हणतात, ‘वर्गणी देत नसाल बघून घेऊ.’ काही कार्यकर्ते थेट म्हणतात, की येता, जाता कामगार आणि कर्मचार्यांना मारहाण करू, वाहनांची नासधूस करू.’ नसत्या कटकटींना घाबरून काही उद्योजक वर्गणीच्या रकमेची तडजोड करतात; परंतु तेही ऐकून घेण्यात येत नाही. त्यामुळे उद्योजकांत भीतीचे वातावरण असल्याचे असोसिएशनने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. उद्योजकांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार केली आहे.
सोलापूर- अक्कलकोट जकात नाक्यावर येऊन जयंती उत्सवासाठी तीन हजार रुपये वर्गणीची मागणी करून मारहाण केल्याप्रकरणी सनी बडेकर (रा. बुधवार पेठ) याच्यासह सातजणांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला. नारायण अडाकूल यांनी शनिवारी रात्री सातच्या सुमाराला फिर्याद दिली आहे. अडाकूल हे महापालिकेचे कर्मचारी आहेत. अक्कलकोट नाका येथे ते काम करत होते. सनी बडेकर व त्याच्या सात साथीदारांनी मिळून आम्हाला वर्गणी द्या म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. वर्गणी न दिल्यास मारण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार सोनोने तपास करीत आहेत.
फिर्यादीसाठी पुढे यावे
वर्गणीसाठी उद्योजकांना त्रास होत असल्याची तक्रार मिळाली आहे. परंतु, संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांत फिर्याद देणे आवश्यक आहे. त्यासाठी कुणाला तरी पुढाकार घ्यावाच लागेल. फिर्याद दिल्यानंतर त्रास होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. पण एकदा देऊन तरी पाहा.’’
-तुषार दोशी, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.