आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाशिम - जिल्हा परिषदेमध्ये सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जवळजवळ झाली असून, अनसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही उमेदवार नाही. त्यामुळे अध्यक्षपदी काँग्रेसच्याच जिल्हा परिषद सदस्याची वर्णी लागणार, हे निश्चित आहे. रिसोड तालुक्यातील हराळ गटातून निवडून आलेल्या सोनाली जोगदंड किंवा मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा गटातून निवडून आलेल्या मनीषा टाले या दोघींपैकी कोण अध्यक्ष होणार, हे सोमवारी स्पष्ट होईल. मागील दहा वर्षांपासून वाशिम जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे.
याहीवेळी आघाडीचीच सत्ता असेल, असे संकेत दोन्ही पक्षांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या 52 सदस्यांपैकी काँग्रेसचे 17, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आघाडीला अजून केवळ दोनच सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. दरम्यान, दोन अपक्ष आपल्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. सत्तास्थापनेसाठी आवश्यक 27 हे संख्याबळ आघाडीकडे जुळून आले असून, काँग्रेसकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे.
असे आहे संख्याबळ
काँग्रेस : 17, शिवसेना-भाजप युती : 15, राष्ट्रवादी काँग्रेस : आठ, मनसे : चार, भारिप-बमसं : तीन, अपक्ष : पाच.
असेही होऊ शकते
रिसोड पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना अशी आघाडी झाली. जिल्हा परिषदेत जर शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र आले, तर 27 हे संख्याबळ जुळून येते. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी अडीच-अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद वाटून घेतले आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच वर्षांसाठी उपाध्यक्षपद पद देऊन मनसेच्या काही सदस्यांना सभापतीपद दिले, तर हे चार पक्ष एकत्र येऊ शकतात. मात्र, ही शक्यता कमी आहे.
चर्चा सुरू आहे
आमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्याची तयारी झाली आहे. पण, अजूनही काही अटींवर बोलणे बाकी आहे. सोमवारी सकाळी दोन्ही पक्षांचे प्रमुख त्यावर चर्चा करणार आहेत. त्यानंतरच आघाडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. अँड. दिलीप सरनाईक, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.