आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गवसु’ कार्यालयास झोपडपट्टीचेच स्वरूप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गलिच्छ वस्ती सुधारणा कार्यालयावरील पत्र्यांना छिद्रे पडली असून, याबाबत अनेकवेळा लेखी पाठपुरावा करूनही त्याचे पत्रे बदलले नाहीत. त्यामुळे येणार्‍या पावसाळ्यात त्या छिद्रांमधून पाणी पडून कार्यालयातील कागदपत्रे भिजण्याचा धोका आहे.

शहरातील 220 झोपडपट्टय़ांच्या कर आकारणी वसुलीकरता गलिच्छ वस्ती सुधारणा हा विभाग वेगळाच करण्यात आला आहे. सिध्देश्वर पेठ येथील सिध्देश्वर प्रशालेच्या मागील बाजूस पत्र्यांच्या खोल्यांमध्ये हे कार्यालय आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे कार्यालय येथे तयार करण्यात आले आहे. या कार्यालयात वीस कर्मचारी कार्यरत आहेत. कार्यालयाच्या खोल्यांची उंची इतकी कमी आहे की कार्यालयातील कपाटे पत्र्यांना लागत आहेत. उंची कमी असल्यामुळे उन्हाची तिव्रता जास्त प्रमाणात जाणवत आहे. येथे काम करत असताना येथील कर्मचार्‍यांना उन्हाच्या दुहेरी झळा बसत आहेत. एका हाताने पुठ्ठय़ाचा वारा घेऊन दुसर्‍या हाताने काम करण्याची त्यांना सवयच झाली आहे. येथील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झाली आहे. ते दुरुस्त केले जात नाही.


फायली भिजण्याचा धोका
कार्यालयात मोठय़ा प्रमाणात फायली आहेत. या फायली कार्यालयाच्या प्रत्येक खोलीमध्ये ठेवल्या आहेत. नागरिकांनी किती भरणा केली आहे, याची नोंद या फायलींमध्ये आहे. पावसाळ्यात पाणी येऊन फायली भिजण्याचा धोका आहे. याबाबत या कार्यालयातील अधिकार्‍यांनी महापालिकेला अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, कोणालाही याबाबत गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही.


दुरुस्ती करू
गलिच्छ वस्ती सुधारणा कार्यालयातील पत्र्यांना छिद्रे पडल्याचे कोणीच सांगितले नाही. कोणी सांगितले नसले तरी तेथील पत्रे पावसाळ्यापूर्वी निश्चित बदलू आणि सर्व फायलींचे जतन करू. अजय सावरीकर, आयुक्त महापालिका