आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसते पाणीच नाही, तर सोबत घागर वाटपही केले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील पाणीटंचाईवर विविध उपक्रमांसाठी दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. कुणी टँकर सुरू केले, कुणी टाक्या वाटल्या, कुणी जनावरांसाठी चारा दिला तर कुणी पशु-पक्ष्यांसाठी पाणपोई. भारतीय जनता पक्षाचे युवक कार्यकर्ते लक्ष्मीकांत गड्डम यांनी गुरुवारी दीडशे घागरी पाण्याने भरून गरीब कुटुंबांना दिल्या. ज्यांच्याकडे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही, फुटक्या घागरीतून पाण्यासाठी वणवण करतात, त्यांच्यासाठी वाढदिवसाची ही छोटीशी भेट असल्याचे ते म्हणाले.

हैदराबाद रस्त्यालगत विडी घरकुल परिसरातील सग्गम नगर, भारत नगर, क्षिरायलिंग नगर, गोकुळ नगर येथील गरीब कुटुंबांना ही मदत देण्यात आली. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या वेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते कृष्णाहरी दुस्सा, रामचंद्र जन्नू, नागेश पल्ली, अजय मद्दा, सागर अतनुरे, र्शीनिवास गंजी, र्शीपाद चिप्पा आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी गड्डम यांच्या कार्याचे कौतुक केले.

शहराच्या हद्दवाढ भागात पाण्यासाठी कामगारांची दाहिदिशा होत आहे. सायकलला घागरी लावून मिळेल तिथून पाणी आणण्याची धडपड असते. अशा स्थितीत त्यांना चांगल्या घागरींची गरज असते, ती गड्डम यांनी पूर्ण केली. नागरिकांना पाण्याची बचत करून स्वच्छ पाणी प्यावे, असे आवाहन र्शी. देशमुख यांनी या वेळी केले.

गरिबांना सावरण्यासाठी..
विडी घरकुल परिसरात चार-चार दिवस पाणी मिळत नाही. मध्यरात्रीनंतर पाणीपुरवठा होतो. त्यासाठी कामगार रात्र जागून काढतात. कमी दाब आणि अपुरा पाणीपुरवठा असल्याने ज्यांच्याकडे नळजोड नाही, अशा गरिबांची उपेक्षाच होते. नळजोडधारक त्यांना पाणीच देत नाहीत. अशांना सावरण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला.
-लक्ष्मीकांत गड्डम, भाजप कार्यकर्ते