आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्जळी: मार्चअखेरची डेडलाइन; अन्यथा 72 कोटींवर पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नगरोत्थान योजनेची कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करावीत, अन्यथा त्यासाठीच्या 72 कोटी रुपयांवर महापालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. शासनाने हे आदेश दिल्याची माहिती मनपा आयुक्त अजय सावरीकर यांनी दिली. वाढीव 24 कोटी रुपयांचा निधी 13 व्या वित्त आयोगतून मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
लहान व मध्यम शहरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत (यूआयडीएसएसएमटी) 17 फेब्रुवारी 2007 रोजी शासनाकडून मान्यता देण्यात आली. सोलापूरसाठीच्या 72 कोटींच्या योजनेची किंमत नंतर 79 कोटी झाली. आता चालू शासकीय दरानुसार 102 कोटी रुपये झाली आहे. शासनाने 72 कोटींचा निधी देऊनही मुदत संपल्यानंतर 47 कोटींची कामे अपूर्ण आहेत. ती कामे मार्चअखेर पूर्ण करावीत अन्यथा मनपाकडील निधी परत घेतला जाईल, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.

अधिकार्‍यांना सुनावले, मनपा स्टोअरमध्ये तीन तास ठिय्यानंतर रात्री उशिरा सोडले पाणी
पाण्यासाठी आम्हीही तोडफोड करायची का, हे बोल आहेत खुद्द महापालिका सभागृह नेते महेश कोठे यांचे! त्यांच्या प्रभागासह विडी घरकुल परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा नसल्याने कोठे यांनी आक्रमक पवित्रा घेत सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस आहिरे यांना सुनावले. महापालिकेचे सत्ताकेंद्र असणार्‍या कोठे यांनी पाण्यासाठी मंगळवारी रात्री पाणीपुरवठा विभागाच्या स्टोअरमध्ये तीन तास ठिय्या मांडला. यामुळे त्यांच्या हतबलतेचे दर्शन झाले.

विडी घरकुल भागातील मोमीन नगर, पंचमूर्ती देवस्थान, एच ग्रुप, आय ग्रुप, जी-1 ग्रुप, भारत नगर, क्षिरायलिंग नगर भागात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. कोठे यांनी स्टोअरमध्ये तीन तास ठिय्या मांडला. पाणी सोडल्याशिवाय हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी नगरसेवक विठ्ठल कोटा उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य अभियंता आहिरे, उपअभियंता गंगाधर दुलंगे स्टोअरमध्ये आले. रात्री उशिरा विडी घरकुल परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला. माजी महापौर आरिफ शेख यांच्या प्रभागातील रेल्वे स्टेशन, काडादी चाळ परिसरात पाणीपुरवठा न झाल्याने तेही कार्यकर्त्यांसह स्टोअरमध्ये ठाण मांडून होते.

ही कामे अपूर्ण
ट्रान्समिशन पाइपलाइनचे 44 पैकी 24 किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. 17 टक्क्यांचे काम अर्धवट आहे. पाणी वितरण व्यवस्थेसाठी 171 किलोमीटर पाइपलाइनचे काम मंजूर असून, 60 किलोमीटरचे काम झाले आहे. ही कामे पूर्ण झाल्यास शहरात समान पाणीवाटप करणे शक्य होईल. शहरासाठी दररोज येणार्‍या पाण्यापैकी 13 एमएलडी पाणी पाइपमध्येच राहते. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.

विडी घरकुल परिसरात पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी महापालिका सभागृहनेते महेश कोठे यांनी मंगळवारी रात्री पाणीपुरवठा विभागाच्या स्टोअररूमध्ये ठिय्या आंदोलन केले.

पाच नव्हे, चार दिवस
विडी घरकुल परिसरात पाच नव्हे तर गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. ज्या परिसरात पाणीपुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या परिसरात दोन दिवसांआड पाणीपुरवठय़ाचे नियोजन आहे.
-बी. एस. आहिरे, सार्वजनिक आरोग्य अभियंता

मी पदाधिकारी आहे का ?
माझ्या प्रभागात पाच दिवसांपासून पाणी नाही. मी मनपाचा पदाधिकारी आहे की नाही, याबाबत शंका येत आहे. दादागिरी करणार्‍यांच्या प्रभागात पाणी सोडले जाते. त्यामुळे आम्हीही तोडफोड करायची का? असा प्रश्न पडला आहे. मलाही आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करावे लागेल, असे दिसते. - -महेश कोठे, सभागृह नेतेही कामे अपूर्ण ट्रान्समिशन पाइपलाइनचे 44 पैकी 24 किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. 17 टक्क्यांचे काम अर्धवट आहे. पाणी वितरण व्यवस्थेसाठी 171 किलोमीटर पाइपलाइनचे काम मंजूर असून, 60 किलोमीटरचे काम झाले आहे. ही कामे पूर्ण झाल्यास शहरात समान पाणीवाटप करणे शक्य होईल. शहरासाठी दररोज येणार्‍या पाण्यापैकी 13 एमएलडी पाणी पाइपमध्येच राहते. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. विडी घरकुल परिसरात पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी महापालिका सभागृहनेते महेश कोठे यांनी मंगळवारी रात्री पाणीपुरवठा विभागाच्या स्टोअररूमध्ये ठिय्या आंदोलन केले.