आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरही हतबल: माझेही ऐकत नाहीत, मी तर काय करणार- अलका राठोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मॅडम आमच्या प्रभागात पाणी नाही.. मी रात्री आठ वाजता स्टोअरला गेले.. अर्धा तासात टॅंकर येईल असे सांगितले.. रात्रीचे अकरा वाजले तरी टॅंकरचा पत्ता नाही.. आमच्या प्रभागात पाणी नाही.. पहाटे चार वाजता पाणी सोडतात.. त्याची माहिती दिली जात नाही. पाण्यासाठी बैठक घेऊन अधिकार्‍यांना सूचना करा, अशा तक्रारी घेऊन नगरसेविका अनिता म्हेत्रे आणि जगदेवी नवले महापौर अलका राठोड यांच्याकडे आल्या. त्यावेळी महापौर राठोडही हतबल झाल्या आणि म्हणाल्या, ‘‘अधिकारी ऐकत नाहीत, मी तरी काय करणार?’’
शहरात पाणीपुरवठय़ात असमानता दिसत असून, त्यासाठी महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी बैठक घेतली. समान पाणीपुरवठय़ासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. तरीही नियोजन नाही. पाण्याची ओरड सुरू आहे. गुरुवारी महापौर राठोड यांच्या प्रभागात ओरड होती. त्यांच्यासह स्थायी समितीचे सभापती विनायक कोंड्याल, नगरसेविका जगदेवी नवले यांच्या प्रभागात पाण्याची टंचाई असल्याने नवले यांनी शुक्रवारी महापौर राठोड यांच्याकडे तक्रार मांडली. पाणी सोडण्याचे नियोजन नाही. अवेळी पाणी येत असल्याने नागरिकांना त्रास होतो. टॅंकरने पाणीपुरवठा केला जात नाही, अशा तक्रारी म्हेत्रे यांनी महापौर राठोड यांच्याकडे केल्या.
पाण्यासाठी वारंवार बैठक घेतल्या, अधिकार्‍यांना सूचना दिली पण त्यांची अमंलबजावणी होत नाही. अधिकारी ऐकत नाहीत. नागरिकांची ओरड सुरू आहे. बैठका घेऊन काही उपयोग नाही, असे म्हणत राठोड यांनी हतबलता व्यक्त केली.
महापालिकेत दूषित पाणी
महापालिकेत येणारे नागरिक आणि नगरसेवकांना दूषित पाणी पाजले जात आहे. महापालिकेच्या आवारातील पाण्याची टाकी धुतली नाही. मनपा कर्मचारी तेथील पाणी देतात.’’
-सुशिला आबुटे, नगरसेविका

औज भरला, दोन महिन्यांची चिंता दूर
उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने औज बंधारा भरला आहे. शुक्रवारी बंधार्‍यात 4.6 मीटर साठा झाला आहे. त्यामुळे शहराच्या पाण्याची दोन महिन्यांची चिंता मिटली आहे.
शहरासाठी उजनी धरणातून तीन जानेवारी रोजी सोडण्यात आलेले पाणी औज बंधार्‍यात 11 जानेवारी रोजी पोहोचले. पण, बंधारा पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. त्यामुळे पुन्हा धरणातून दोन हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. बंधार्‍यातील पाणीसाठा संपल्याने शहरावर जलसंकट ओढवले. गेले काही दिवस शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला. उजनी धरणातून औज बंधार्‍यात पाणी सोडल्याने पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. बंधारा 4.5 मीटर भरून देण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची होती. बंधारा भरल्याने विसर्ग बंद केला आहे.