आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांना सोलापूरात फिरू देणार नाही; विरोधकांचा इशारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हिप्परगा तलावातील पाणी शहरास देणे बंद करण्याच्या पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या निर्णयाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आधीच सोलापूरवर जलसंकटाचे सावट आहे. त्यात हा निर्णय योग्य नसल्याचे सांगत महापालिकेतील विरोधी पक्षांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णयाच्या विरोधात सूर लावला आहे. काँग्रेसने हा निर्णय एकतर्फी असल्याची टीका केली आहे.
र्शी. ढोबळे यांनी 1 फेब्रुवारीस पाणीटंचाईसंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यानंतर हिप्परगा तलावातील पाणी 11 गावांसाठी असून शहरासाठी आता पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले होते. हिप्परगा तलावातून शहरासाठी रोज दहा एमएलडी (दशलक्ष लिटर दररोज) पाणीपुरवठा केला जातो. हा पुरवठा थांबल्यास आगामी काळात निर्माण होणार्‍या पाणीटंचाईस पालकमंत्री ढोबळे जबाबदार असतील. त्यांच्या विरोधात भाजप आंदोलन करणार असल्याचे सौ. तडवळकर म्हणाल्या.

शहरास तीन स्रोतांतून पाणीपुरवठा होतो. उजनी जलाशयातून जलवाहिनी, टाकळी योजना व हिप्परगा तलाव यांचा समावेश आहे. टाकळी बंधार्‍यात पाण्याची पातळी कमी झाल्याने उजनीतून पाणी सोडण्यात आले. फेब्रुवारीपर्यंत पुरेल इतके पाणी बंधार्‍यात आहे.

या भागात होतो पाणीपुरवठा
कस्तुरबा मार्केट परिसर, घोंगडे वस्ती, सम्राट चौक, शेळगी, महताब नगर, विडी घरकुल, दयानंद कॉलेज परिसर, बुधवार पेठ, जोडभावी पेठ, शाहीर वस्ती, भवानी पेठ परिसर या भागात हिप्परगा तलाव योजनेतून पाणीपुरवठा होतो.

फिरणे मुश्किल करू
"सोलापूर शहराचा पाणीपुरवठा बंद केल्यास मोठी समस्या निर्माण होईल. त्यामुळे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे शहरात फिरणे मुश्किल करू.’’
-अंजली चौगुले, नगरसेविका

पालकमंत्र्यांना बंदी घालू
"पाणी बंद केल्यास पालकमंत्री ढोबळे यांना शहरात फिरू देणार नाही. सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन देऊ.’’
-आनंद चंदनशिवे, नगरसेवक

हिप्परगा तलाव स्थिती अशी
>1931 पासून शहरासाठी पाणीपुरवठा
>750 मी. मी. व्यासाची 7 कि.मी.ची जलवाहिनी
>योजनेची क्षमता 22.5 एमएलडी
>रोज 9 एमएलडी पाणी
>एक एमएलडी गळती
>दुबारा पंपिंगची योजना, 15.58 लाख रुपये खर्च अपेक्षित
>90 एचपीचे एक, 125 अश्वशक्तीचे 3 पंप सुरू
>19 फूट पाणी, त्यात सुमारे 16.5 फूट गाळ, अडीच फूटच पाणी
>मे पर्यंत पुरेल इतकाच साठा

बंद न करण्यासाठी आग्रह करणार
"शहरासाठी हिप्परगा तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद करता येत नाही. या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नगरसेवक, पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर नगरसेवक पालकमंत्री ढोबळे यांना भेटतील आणि पाणीपुरवठा बंद न करण्याचा आग्रह धरतील. पालकमंत्री विनंतीचा विचार करतील.’’
- पद्माकर काळे, नगरसेवक

पालकमंत्र्यांचा एकतर्फी आणि चुकीचा निर्णय
"हिप्परगा तलावातून पाणी बंद करण्याचा पालकमंत्री ढोबळे यांचा निर्णय एकतर्फी आणि चुकीचाआहे. तो निर्णय त्यांनी बदलावा. पाणी बंद केल्याने शहर उत्तर, अक्कलकोट रोड आणि हैदराबाद रोड परिसरात पाणीपुरवठय़ात परिणाम होणार आहे. आधीच शहरावर जलसंकटाचे सावट आाहे. त्यामुळे हा निर्णय घेऊ नये.’’
- महेश कोठे, सभागृह नेता, महापालिका

पालकमंत्र्यांना घेराओ
"हिप्परगा तलावातून पाणीपुरवठा बंद केल्यास पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांना शासकीय विर्शामगृहात घेराओ घालून आंदोलन करण्यात येईल.’’
-प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेवक