आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोठाळवाडी धरणातून पाणीउपसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब - तालुक्यातील कोठाळवाडी धरणात 5 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, तलावातील पाणीउपसा शेतीसाठी केला जात आहे. शेतक-यांनी केलेली ऊस लागवड व पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे धरणात 60 विद्युतपंपांद्वारे पाणीउपसा केला जात आहे. शेतीसाठी होत असलेला पाण्याचा उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
शेतीसाठी होत असलेला पाणीउपसा सुरू राहिल्यास आगामी काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ईटकूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने अनेकवेळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. महावितरणलाही धरण परिसरातील ट्रान्सफार्मर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, वीज सुरू असल्यामुळे धरणात पंप टाकून पाणी उपसा सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने विद्युत पंपधारकांवर कारवाई करून पाणी उपास रोखण्याची गरज आहे. यासंदर्भात ग्रामस्थांतून मागणी होत आहे. ईटकूर, हावरगाव, कोठाळवाडी, वाकडी, कन्हेरवाडी, आंदोरा यासह इतर सात ते आठ गावांना या धरणातून पाणीपुरवठा होत अहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. आगामी काळात अशीच परिस्थिती राहिल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. यावेळी प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी मोठा खर्च करावा लागेल.
बेसुमार पाणीउपशाकडे प्रशासनाचा कानाडोळा
- पाणीउपसा बंद करण्याची गरज
कोठाळवाडी धरण परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पाणीउपसा करीत आहेत. हा पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाने मार्चमध्ये कारवाई केली होती. त्यानंतर प्रशासनाने या तलावातील पाणीउपशाकडे दुर्लक्ष केले. परिणामी परिसरातील शेतक-यांनी मे - जून दरम्यान तलावातील पाणीउपसा करून पिके घेण्यास सुरुवात केली. यामुळे तलावातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास कोठाळवाडी गावासह परिसरातील आठ गावांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागेल. प्रशासनाला पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतील. हा खर्च वाचवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पाणीउपसा बंद करण्याची गरज आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
- शेतीसाठी होत असलेल्या पाणी उपशाबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाला कळविले. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी पाणीउपसा सुरूच आहे. पाणीउपसा बंद करण्यासाठी धरण परिसरातील ट्रान्सफार्मर बंद करण्याची गरज आहे.’’
महादेव आडसूळ, उपसरपंच, ईटकूर.