आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी चोरी; 40 जणांवर फौजदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेच्या पाणीपुरवठा नळ योजनेतून अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन चोरून पाणी वापरणार्‍या 40 मिळकतदारांचा शोध घेऊन महापालिकेने फौजदारी कारवाई केली. बेकायदेशीर बांधकामापाठोपाठ आता बेकायदेशीर नळ कनेक्शनकडे मनपाने लक्ष वेधले आहे. अनधिकृत पाणी वापरल्याप्रकरणी गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये माजी नगरसेवक सुनील खटके यांच्यासह उद्योगपती, शिक्षक अशांचा समावेश आहे.

पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आठ झोन अधिकार्‍यांना पाणी चोरणार्‍यांचा शोध घेण्याचे फर्मान सोडले होते. त्यानुसार गुरुवार-शुक्रवार अशा दोन दिवसांत 40 जण पाण्याची चोरी करीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानुसार फौजदार चावडी, विजापूर नाका आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आहेत. दीपक शामराव पवार (रा. गुरुदेवनगर, आकाशवाणी केंद्राजवळ) यांनी फौजदार चावडी तर अविनाश अंत्रोळीकर (रा. सात रस्ता, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे.

विजापूर नाका पोलिसात 11 जणांवर गुन्हे
विजापूर नाका पोलिस ठाण्याअंतर्गत 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विजापूर रस्त्यावरील रूबीनगर झोपडपट्टी परिसरात तपासणी करताना बोगस नळ कनेक्शन घेऊन पाणी वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेणुका देवकते, शरद कांबळे, भानम्मा मत्ते, रामू माने, अनुसया गुरुभेट, केरप्पा काळे, वजीर जमादार, नौशाद सिकलगार, इंदुबाई स्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अविनाश अंत्रोळीकर यांनी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमाराला फिर्याद दिली आहे.

25 हजार बोगस नळ
मनपा रेकॉर्डवर शहरात 84 हजार मिळकती आहेत, त्यापैकी 44 हजार 731 जणांकडे नळ कनेक्शन आहेत. उर्वरित 40 हजारांपैकी सार्वजनिक नळ आणि पाण्याची लाइन नाही असे सुमारे 15 हजार मिळकतदार वगळले तरी सुमारे 25 हजार जणांकडे बोगस नळ असल्याचा वारंवार आरोप होतो. अधिकारी हे मान्य करतात.

नळांची तपासणी होणार
बेकायदेशीरपणे नळ कनेक्शन घेऊन पाणी वापरणार्‍यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आठ झोन अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू झाली.

फिर्याद खोटी : खटके
माझ्या व पत्नीच्या नावे कुठेही स्थावर मालमत्ता नाही. त्यामुळे मी बोगस नळ कनेक्शन घेण्याचा प्रश्न नाही. सुडबुद्धीने आमच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. शहनिशा न करता चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका कर्मचार्‍यांविरुद्ध दावा दाखल करणार असल्याचे माजी नगरसेवक सुनील खटके यांनी सांगितले.

20 एमएलडी पाण्याची चोरी
दररोज शहराला 170 एमएलडी इतके पाणी मिळते. त्यापैकी 25 एमएलडी उद्योग, 100 एमएलडी शहरासाठी तर 10 ते 15 एमएलडी गळती होते. अन्य 20 एमएलडी पाण्याची चोरी असे गणित मांडले जाते होते.

यांनी केला चोरून पाण्याचा वापर
परशुराम आसबे, उत्तम वाघमोडे, ज्ञानेश्वर हुणचीकट्टी, दत्तात्रय पवार, अमृत सलगर, अरविंद कोथंबिरे, बाबूलाल शेख, जयप्रकाश मंठाळकर, माजी नगरसेवक सुनील खटके,शंकर चव्हाण, देवराव सुरेराव, मकबूल शेख, धर्मा चव्हाण, राजू सुरेराव, अरुण सलगर, आशाक घोगरे, चंद्रकांत मोरे, बब्रुवान सोनकांबळे, मच्छिंद्र सोनकांबळे, गोविंद रोकडे, माताबाई गोरखा, एस. एस. सूर्यवंशी, बाबू गेनू रोकडे, कादरखान रस्तुम, सोनाबाई कोळेकर, लक्ष्मीबाई भगरे, निरंजन पाटील (रा. सर्वजण गवळी, दमाणीनगर परिसर). यांनी महापालिकेची परवानगी न घेता, अनामत रक्कम न भरता अनधिकृतपणे पिण्याचे पाणी नळाद्वारे वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत अकरा तर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका कारखानदारावर चोरून पाणी वापरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.