सोलापूर - एककाळ होता जेव्हा सिद्धेश्वर तलावातील पाणी भाविकांसाठी तीर्थ होते. शहरवासीयांची तृष्णा या पाण्याने भागायची. परंतु सध्या या तलावातील पाणी पिण्यायोग्य तर सोडाच ते वापरण्यायोग्यही राहिले नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने प्रयोगशाळेत केलेल्या परीक्षणातून पुढे आले आहे. या तलावामध्ये अनेक मार्गाने आजही सांडपाणी मिश्रीत होत आहे. त्यामुळे तलावात भरमसाठ शैवालाची वाढ होत आहे.
सिद्धेश्वर तलावातील प्रदूषित पाणी अंगावर पडले तर त्वचेला खाज सुटून त्रास होण्याची शक्यता आहे. तलावातील पाणी पुन्हा एकदा शुद्ध तीर्थ बनायचे असेल तर मिश्रीत होणारे सांडपाणी त्वरित थांबवून तलावातील पाणी फिरते राहील अशी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तलावातील पाणी फिरते ठेवण्यासाठी तलावात कारंजे सुरू करणे गरजेचे आहे.
मंदिराभोवती असणाऱ्या तलावामुळे मंदिराला शोभा आली. परंतु, त्यात शैवाल असल्याने परिसरात दुर्गंधी पसरणे, मासे मृत होणे असे वारंवार होत आहेत. तलावाचे सौंदर्य वाढवणे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तलावातील पाणी शुद्ध राहील याची काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे. तलावातील पाणी शुद्ध आणि स्वच्छ ठेवले तर पाण्याचा हिरवा रंग जाऊन तलाव खऱ्या अर्थाने तीर्थ बनू शकेल. परंतु यासाठी तलावात अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.तलावाची स्वच्छता झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे स्वच्छ आणि शुद्ध पाणी खुलून दिसत होते.
महापालिकेला सूचना
-मंदिरसमिती महापालिकेकडून माहिती घेतली. तलावातील पाणी प्रवाही कसे राहील, याविषयी उपाय केले जातील. तलावामध्ये ड्रेनेजचे पाणी येणार नाही, यासंबंधी महापालिकेस सूचना दिल्या आहेत. ते पाणी लवकरच बंद होईल. तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी