आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा विस्कळीत: महापौरांच्या प्रभागात ‘जागरण-गोंधळ’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, शहराच्या प्रथम नागरिक महापौर अलका राठोड यांच्या प्रभागातील (क्रमांक 47) नागरिकांनाही याचा फटका बसला. महापौरांच्या प्रभागात बुधवारी पाणी येण्याचा दिवस होता. मात्र, गुरुवारी सायंकाळनंतर पाणीपुरवठा करण्यात आला. शहरात पाण्याची ओरड सुरू असताना महापालिकेने नेमलेले खासगी टँकरचालक वेतनासाठी संपावर गेल्याने समस्या गंभीर झाली असून, हद्दवाढ भागात गुरुवारी टँकरने पाणीपुरवठा झाला नाही.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या औज बंधार्‍यात 3.67 मीटर इतका साठा आहे. पाण्याची उपलब्धता असली तरी बुधवारी तेथे वीजपुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी शहरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. खुद्द महापौर राठोड यांच्या प्रभागातील नागरिकांना पाणी मिळाले नाही. त्यासाठी त्यांनी गुरुवारी अधिकार्‍यांना फोन केला तरी पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. स्वागतनगर, सुशीलनगर, माशाळेवस्ती या भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. आदित्य नगर येथील पाण्याच्या टाकीत साठा होत नसल्याने थेट बायपास पाणी वळवून पुरवठा करण्यात येत आहे. नगरसेविका जगदेवी नवले यांच्या प्रभागात टँकरने पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे त्यांनी महापौर अलका राठोड यांच्याकडे गुरुवारी तोंडी तक्रार केली.