आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांआड पाण्यासाठी प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेचेनूतन आयुक्त विजयकुमार काळम -पाटील यांनी रविवारी शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात संबंिधत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा यंत्रणेचा आढावा घेतला. शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा कसा करता येईल? या संदर्भात चार दिवसांत सूचनासह अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. नव्या आयुक्तांनी पदभार घेताच सांगितलेल्या पंचसूत्रीनुसार शहर पाणीपुरवठ्याकडे प्राधान्याने लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन सध्या कोलमडले आहे. चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. आजच्या बैठकीत पाणीपुरवठ्यासंदर्भातील अडचणी उपाययोजना याबाबत चर्चा झाली. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नांदणी येथे ब्रेक प्रेशन टॅन्क बांधणे, पाणी पुनर्वापर करण्याची प्रक्रिया उभी करणे, जलशुद्धीकरणाच्या फिल्टर मीडियामधील वाळू बदलणे आदी महत्त्वाची कामे करणे गरजेचे असल्याचे म्हणणे अधिकाऱ्यांनी आयुक्तासमोर मांडले.

या वेळी सार्वजनिक आरोग्य अभियंता अंबरुषी रोडे, उपअभियंता विजय राठोड, उपअभियंता सिध्दप्पा उस्तुरगी, आर एम रेड्डी, लक्ष्मण चलवादी, आलमेलकर, चौबे यांच्यासह काही झोन अधिकारी उपस्थित होते. नूतन आयुक्त काळम यांनी पंचसूत्रीप्रमाणे शहर विकासाचे नियोजन केले आहे. त्यानुसार त्यांनी पाणीपुरवठ्याला प्राधन्य दिले आहे.

पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती
शहरालाउजनी(७५ एमएलडी), टाकळी (६५ एमएलडी) आणि हिप्परगा (१० एमएलडी) येथून पाणीपुरवठा केला जातो. पाणी नसल्याने हिप्परगा येथील पाणी उपसा बंद आहे. उजनी येथे ६०० एचपीच्या सहा पंपद्वारे पाणी उपसा कला जातो. त्यातील चार पंप चालू असून दोन स्टॅन्डबाय आहेत. सोरेगाव येथे ४७५ एचपीचे चार पंप असून दोन चालू तर दोन स्टॅन्डबाय ठेवण्यात आले आहेत. शहरात ९९ हजार अधिकृत नळधारक आहेत. शहरासाठी १४० एमएलडी पाणी उपसा केला जात असला तरी ३० ते ३५ एमएलडी पाण्याची गळती असल्याने प्रत्यक्ष शहराला ८५ एमएलडी पाणी मिळते. याशिवाय ते १० एमएलडी एमआयडीसी चिंचोळी, साडे तीन ते चार एमएलडी रेल्वे विभाग, साडेचार ते पाच एमएलडी गोदूताई विडी घरकुल, साडे तीन ते चार एमएलडी पाणी अक्कलकोट रोड एमआयडीसी या परिसरात लागतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी या वेळी आयुक्तांना दिली.