आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिका आयुक्तांनी पकडली पाणीचोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- उजनी ते सोलापूर जलवाहिनीतून एमआयडीसीला पाणी देणारा पाइप फोडून मोटारीने उपसा केला जात असल्याचा प्रकार महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी उघडकीस आणला. जलवाहिनीची पाहणी करण्यासाठी जात असताना मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी ही पाणीचोरी पकडली. आयुक्तांच्या आदेशानुसार सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन टँकरचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी पाणीपुरवठा करण्याचा मक्ता पवार वॉटर सप्लायर यांना देण्यात आला आहे. पाणीपुरवठा मक्तेदार उजनी जलवाहिनीवरील जोडच्या ठिकाणचा पाइप फोडून जनरेटरच्या साहाय्याने टँकरमध्ये पाणी भरत होता.

आयुक्त सावरीकर, सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे, उपअभियंता विजय राठोड, किसन कापसे यांनी 24 हजार लिटर पाणी भरलेले दोन टँंकर पकडले. टँकरचालक उडवाउडवीची उत्तर देत असल्याने या घटनेची माहिती सोलापूर तालुका पोलिस ठाण्यास देण्यात आली. साहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. दोन टँकर, जनरेटर जप्त केले.

पाण्याचे मीटर नाही : पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला जोड दिल्यानंतर एमआयडीसीसाठी घेण्यात येणार्‍या पाण्याची मोजणी करण्यासाठी तेथे मीटर बसवण्यात आला, पण हा मीटर बंद अवस्थेत होता. त्याकडे एमआयडीसीने दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले.

ठिकाणची गळती दुरुस्ती : उजनी ते सोलापूरदरम्यान जलवाहिनीला 50 ठिकाणी लहान-मोठी गळती लागली आहे. गळती दुरुस्त करण्याचे काम एक डिसेंबरपासून हाती घेण्यात आले. अनगरजवळ मोठी गळती होती. त्याचे काम सोमवारी पूर्ण करण्यात आले.

एमआयडीसीचे पाणी तात्पुरते बंद
उजनी जलवाहिनीवरून पाणी चोरी निदर्शनास आली आहे. त्याठिकाणची गळती दुरुस्त करण्याचे आदेश एमआयडीसीला देण्यात आले आहेत. त्यामुळे एमआयडीसीचा पाणीपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.
- विजय राठोड, उपअभियंता, मनपा