आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Water Shortage At Solapur, Tilak Holi Massage Pass In Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरात पाणी टंचाईमुळे 'टिळा होळी'; घरावर लावले पाणी बचतीचा संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्ह्यातील दुष्काळ आणि शहरात निर्माण झालेली पाणीटंचाईची ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन होळी व रंगपंचमीनिमित्त होणारी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी नागरिकांसह अनेक संस्था, संघटना पुढे येत आहेत. रंगपंचमी खेळण्यासाठी पाण्याशिवाय वापरता येईल, अशा नैसर्गिक रंगांकडे सोलापूरकरांचा कल वाढला आहे. जैन सोशल ग्रुपनेही रविवारी टिळा होळी खेळत पाणी बचतीचा संदेश दिला तर जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क कॉलनीतील युवकांनी यंदा रंग न खेळण्याचा निर्धार केला.
शहरात जलसंकटाची छाया गडद होत आहे. शहरात सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने तीन एमएलडी पाण्याची अतिरिक्त गरज लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन बॉम्बे पार्कमधील युवकांनी रंगपंचमी न खेळण्याचा निर्धार केला आणि पाणी बचतीसाठी जनजागृतीही केली आहे. येथील घराघरांवर फलक लावून रंगपंचमी खेळू नका असा संदेश दिला जात आहे.
गुजराथी मित्र मंडळाच्या कार्यालयात जैन समाजबांधवांनी पाणी बचत करत टिळा लावून होळी उत्सव साजरा केला. उन्मेश कर्नावट ललित वेद, नीताबेन शहा, साधना मुनोत, अभय गांधी, हर्षक कोठारी, केतन शहा, जवाहर मुनोत, विशाल चोरलिया आदी समाजबांधव उपस्थित होते.


होळी आणि रंगपंचमीला शक्यतो पाण्याचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करीत टिळा होळी खेळण्याचे आवाहन समाजबांधवाना करण्यात आले आहे.
-उन्मेश कर्नावट, अध्यक्ष जैन सोशल ग्रुप

शहरातील जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आम्ही तरुण एकत्र येऊन रंगपंचमी न खेळण्याचा निर्णय घेतला. तसेच कॉलनीतही घराघरांवर फलक लावले. याचा परिणाम नक्कीच होईल.
-गणराज गोरे,अध्यक्ष बॉम्बे पार्क युवा मंडळ

यंदा पाण्याची टंचाई आहे. पाच पाच दिवस पाणी नाही. पाण्याची ही टंचाई पाहता रंग न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही महिला घरोघरी जाऊन रंग खेळत होतो. यंदा रंग खेळणार नाही.
- राजश्री कानगुंडे, गृहिणी

इको फ्रेंडलीकडे कल
यंदा इको फ्रेंडली रंगांना जास्त मागणी आहे. त्याचे दरही परवडणारे असून, या रंगांच्या वापरामुळे पाण्याची बचत होते. यंदा नैसर्गिक रंगांची आवक वाढली आहे. इको फ्रेंडली रंगाबाबत प्रबोधन झाले आहे.’’ अतुल सुगंधी, रंगाचे व्यापारी

विद्यार्थी पाजणार पक्ष्यांना पाणी
अक्कलकोट रस्त्यावरील अभिषेकनगरातल्या विश्वभूषण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदा रंग न खेळण्याचा संकल्प केला. शाळेच्या आवारातील झाडांवर पक्ष्यांना पाणी देण्यासाठी भांडी ठेवली आहे. आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी याबाबत पुढाकार घेतला. पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांसह पशु-पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. या स्थितीत रंगपंचमी कशी खेळायची? त्यापेक्षा पशु-पक्ष्यांना पाणी देऊया, असे त्यांनी ठरवले. त्यांना मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे, सहशिक्षक प्रवीण पाटील, दिनेश गवळी यांनी मार्गदर्शन केले.

नैसर्गिक रंगांची आवक वाढली
मागील वर्षापेक्षा यंदा नैसर्गिक रंगांची आवक 10 टक्के अधिक झाली आहे. इंको फ्रेंडली रंगांचा दर 70 ते 80 रुपये तर काचेरी रंगांचा दर 200 ते 250 रुपये प्रतिकिलो आहे. काचेरी रंगास पाण्याची गरज असते तर इंको फ्रेंडली रंगास पाण्याची गरज नाही.

रंग खेळणार नाही
पाणी वाचवण्याचा संदेश देत, पूर्व विभाग ताता गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमी खेळणार नाही, असा निर्णय घेतला. इतरांनीही खेळू नये, असे आवाहन केले. मंडळाची रविवारी बैठक झाली. दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना पाण्याचा अपव्यय टाळणे हाच पर्याय आहे. हा संदेश समाजात घेऊन जाण्याचे आवाहन मंडळाने कार्यकर्त्यांना केले.