आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यावरून तापतोय रेल्वेचा वातानुकूलित डबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रविवारी बंगळुरू-मुंबई एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डबा ए 1 व ए 2 डब्यामध्ये पाणी नसल्याने प्रवाशांनी ही गाडी थांबवून ठेवली तर दुसरीकडे अहमदाबाद-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या डब्यामध्ये देखील पाणी नसल्याने दौंड रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी ही गाडी थांबवून ठेवली. प्रवाशांचा वाढता उद्वेग रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्षात न घेतल्यास एखादी दुर्दैवी घटना सोलापूर विभागात देखील घडू शकते याची शक्यता नाकारता येत नाही.

रविवारी उद्यान एक्स्प्रेसमध्ये अशीच घटना घडली. गाडीतील पाणी संपल्याने ए 1 व ए 2 च्या प्रवाशांनी संबंधित डब्याच्या तिकीट पर्यवेक्षकांकडे तक्रार केली. या वेळी सुद्धा काही शाब्दिक चकमकी उडाल्या. मात्र, गाडी सोलापूरला येताच डब्यात पाणी भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रवाशांनी नमते घेतले. तर अहमदाबाद एक्स्प्रेसला देखील अशीच घटना घडली. विरार व दौंडला प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली. जवळपास 35 मिनिटे गाडी दौंडला थांबवण्यात आली होती. जोपर्यंत डब्यात पाणी भरणार नाही, तोपर्यंत गाडी सोडणार नसल्याच्या पवित्र्याने प्रशासन हतबल झाले. नागरिकांनी अशी भूमिका घेतल्याने गाडीत पाणी भरल्यानंतर ती मार्गस्थ झाली.

प्रवाशांच्या संयमाची परीक्षा
मागील आठवड्यात चेन्नई-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांत पाणी नसल्याच्या कारणावरून प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत तिकीट पर्यवेक्षकाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अद्याप नियोजन केल्याचे दिसत नाही. वातानुकूलित डब्यामध्ये पाणी नसल्याच्या कारणावरून प्रवासी व तिकीट पर्यवेक्षक यांच्यात संघर्षाची ठिणगी उडत आहे. डब्यात पाणी असण्यास व नसण्यास तिकीट पर्यवेक्षकांचा संबंध नाही. मात्र, तो रेल्वे कर्मचारी असल्याने प्रवासी त्यांच्याकडेच तक्रारी करतात. अनेकदा तक्रारी प्रवाशांच्या संयमाबाहेर जातात. त्यातून वादावादी तर कधी हाणामारीच्या घटना घडत आहेत.

नियंत्रण कक्षाला कल्पना द्यावी
डब्यात पाणी नसल्यास तिकीट पर्यवेक्षकांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला याची कल्पना द्यावी. नियंत्रण कक्षामार्फत संबंधित विभागास डब्यामध्ये पाणी उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात येतील. प्रवाशांनी ही संयम बाळगावा. रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.’’ एस. क्यू. हुसेन, वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक.

प्रवाशांनी टोकाची भूमिका घेऊ नये
रेल्वे प्रशासनाने ज्या सुविधा प्रवाशांना देणे बंधनकारक आहे. ती सुविधा दिलीच पाहिजे. गाडीत तिकीट पर्यवेक्षक व प्रवाश्यांच्यात चांगले संबंध असले पाहिजे. प्रवाशांनी देखील एकदम टोकाची भूमिका न घेता संयमाने प्रo्न सोडवावा. प्रवाशांनी सहकार्य व मदतीची भावना ठेवावी.’’ संजय पाटील, उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा प्रवासी संघ