आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा १५ एमएलडीने वाढण्याचा मार्ग झाला सुकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - नांदणी(ता. दक्षिण सोलापूर) येथे टाकळी-सोरेगाव जलवाहिनीवरचा पाण्याचा प्रचंड दाब कमी करण्यासाठी टाकी (बीपीटी) बांधून तयार आहे. त्याला जलवाहिनी जोडण्यात येणार आहे. ती सेवेत आल्याने शहरात रोज १५ दशलक्ष लिटर पाणी जास्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जोडणीचा निर्णय सोमवारी होणार आहे. जोडणी झाल्यानंतर त्यातून पाणीपुरवठा सुरू होईल.
टाकळी उपसा केंद्रात सध्या तीन पंप उपसा करत आहेत. ‘बीपीटी’ बांधल्याने चौथा पंप सुरू करता येणार आहे. त्यामुळे वाढीव १५ एमएलडी पाण्याचा उपसा होणार आहे. ‘बीपीटी’ नसताना चारही पंप सुरू केले असता जलवाहिनीत पाण्याचा प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे जलवाहिनी फुटण्याचा, गळती लागण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी ‘बीपीटी’ बांधण्यात आले. वाढलेल्या पंपामुळे निर्माण होणारा पाण्याचा जादा दाब या (बीपीटी) टाकीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जादा पाणी उपसा करता येणार आहे.

पंधरावर्षांनंतर ‘बीपीटी’
नांदणीजवळयापूर्वी दाब कमी करण्यासाठी टाकी होती. मात्र, त्यांची उंची पुरेशी नव्हती. कमी उंचीमुळे टाकी ओसंडून वाहत होती. त्यामुळे ती गेल्या १५ वर्षांपासून बंद ठेवण्यात आली होती. त्याचा प्रतिकूल परिणाम शहराच्या पुरवठ्यावर होत होता. उपशाची क्षमता असूनही ती करता येत नव्हती. त्यामुळे नवीन टाकी बांधण्यासाठी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना सूचना केली होती. मक्तेदार अतुल सोनी यांनी सहा महिन्यांपूर्वी काम सुरू करून ते मुदतीत पूर्ण केले.

पुरवठा सुरळीत होण्यास मदत
पाणीवाढल्यास हद्दवाढ भागातील जुळे सोलापूर, विडी घरकुल, अक्कलकोट रोड परिसरातील पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. शहराला सध्या रोज ८० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत आहे. आता तो ९५ दशलक्ष लिटर होईल. त्यामुळे पाण्याची समस्या चांगल्याच प्रमाणात कमी होऊ शकेल. शहराची गरज रोज १३५ दशलक्ष लिटर आहे. मात्र, तेवढा पुरवठा होत नाही.

अशी आहे ‘बीपीटी’
उंची : १६.५ मीटर
परीघ : ४.५ मीटर
खर्च : ६० लाख
कामाची मुदत : महिने
रोजचे कामगार : १७
वाढ : १५ एमएलडी
नांदणीजवळ "बीपीटी' बांधून तयार आहे. दुसऱ्या छायाचित्रात जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे.

गुरुत्वाकर्षण तत्त्वाने पाणी येणार
नांदणीयेथील ‘बीपीटी’ची उंची १६ मीटर ठेवण्यात आली आहे. सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी गुरुत्वाकर्षण तत्त्वाने येणार आहे. बीपीटी काम पूर्ण झाल्याने टाकळी पंप हाऊस येथे तीन ऐवजी चार पंप सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात रोज १५ एमएलडी पाण्याची आवक जास्त होईल. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यावर होणार आहे.

जलवाहिनीची गळती
टाकळीउपसा केंद्र ते सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या जलवाहिनीला १५ ठिकाणी गळती लागलेली आहे. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात गळती आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. बुधवारी काम सुरू होईल. एका दिवसात काम संपणार आहे. या कामासाठी प्रशासनाने पथक नेमले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सेवेत येण्यापूर्वी चाचणी
टाकळीते सोरेगाव दरम्यान असलेल्या नांदणी येथील जलवाहिनीजवळ ‘बीपीटी’ बांधले आहे. ते जलवाहिनी जोडण्यास तयार आहे. त्याची चाचणी घेण्यात येईल. ते निर्दोष आढळल्यास चौथा उपसा पंप सुरू करता येईल. त्यामुळे शहरात १५ एमएलडी पाणी वाढेल.” अंबऋषीरोडे, सार्वजनिकआरोग्य अभियंता, महापालिका

जोडणीचा साेमवारी निर्णय
‘बीपीटी’ जोडची तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी शुक्रवारी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्यक्ष जोड देण्याबाबतचा निर्णय सोमवारी घेणार आहे.” विजयकुमारकाळम-पाटील, आयुक्त,महापालिका
बातम्या आणखी आहेत...