आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा प्रायोगिक तत्त्वावर सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू झाला. हद्दवाढ भागात शनिवारपासून त्याला सुरुवात झाली. पुढील आठवड्यापासून त्याचा पूर्ण अंमल सुरू होणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून सोलापूरकरांना तीन दिवसांआड म्हणजे दर पाच दिवसांनी पाणी मिळत होते.

पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतर महापालिका प्रशासनाने दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला. त्याचे नियोजन गुरुवारी करण्यात आले. शहराचे तीन विभाग केले असून त्यांना प्रत्येकी सहा दिवसांत दोन दिवस पाणी मिळणार आहे. बुधवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे.
शहराच्या गरजेइतके पाणी मिळत असले तरी गळती मोठी आहे. रोज १३५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उपसा होत आहे. मात्र, गळती वजा जाता १०८ एमएलडी पाणी उपलब्ध होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड यांनी सांगितले.

हद्दवाढ भागातील गोकुळ नगर, विष्णूपुरी, रुबी नगर, गणेश बिल्डर्स आदी भागात पाणीपुरवठा करण्यात आला. आठ दिवस प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवसांआड सुरू ठेवून चाचपणी करण्यात येणार आहे. वेळापत्रकानुसार नियोजन करून पूर्ण पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
सोलापूर सोलापूरपरिसरात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यामुळे एकरुख (हिप्परगा) तलावात पाणी आले आहे. मात्र, ते पूर्ण भरलेले नसून सहा फूट भरले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ते थोडेसे कमी आहे. तलाव भरण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.

शहराला उजनी जलाशय, औज बंधारा आणि हिप्परगा तलाव अशा तीन स्रोतांतून पाणी मिळते. त्यापैकी तलावात पाणी कमी झाल्याने पाण्याचा उपसा कमी झालेला होता. तलावाच्या वरच्या बाजूस सावरगाव, माळुंब्रा आणि तामलवाडी येथे लहान धरण आहेत. ते तीनही भरत आले की पाणी पुढे सोडण्यात येईल आणि ते पाणी हिप्परगा तलावात येईल. भरलेल्या तलावातून रोज दहा दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शहराला पुरवठा होतो. परंतु सध्या सहा एमएलडी मिळत आहे.

दुबार उपसा बंद
दरम्यान,हिप्परगा तलावातील पाणी कमी झाल्याने सोलापूर महापालिकेला दुबार उपसा करावा लागत होता. तलावात पाण्याची पातळी वाढल्याने तो उपसा आता थांबला आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीने पाणी येत आहे. त्यामुळे होणारा दुबार उपसा बंद केलेला आहे.