आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 तासांचा पाणीपुरवठा आता होणार सात तासांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील विस्कळीत पाणीपुरवठय़ात सुधारणा आणण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करत आहे. कमी दाबाने आणि उशिरापर्यंत चालणारा पाणीपुरवठा जलदगतीने आणि उच्च दाबाने करण्यासाठी जुळे सोलापुरातील दोनपैकी एक एमबीआर (मास्टर बॅलन्सिग लेजवार)पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा करून चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे जुळे सोलापूर, विजापूर रोड, होटगी रोड परिसरात 18 तास होणारा पाणीपुरवठा अवघ्या सात तासात संपला. या प्रक्रियेमुळे रात्रीचे जागरण थांबणार आहे.
काय होईल फायदा
सोरेगाव येथून आलेले पाणी जुळे सोलापूर येथील एमबीआर टाकीच्या 35 मीटर उंचीच्या टाकीत साठवण्यात येईल. त्यानंतर ते पाणी चार टाक्यांमध्ये साठवण्यात येईल. या प्रक्रियेमुळे उच्च दाबाने पाणीपुरवठा होईल. पहाटे पाचपासून रात्री अकरापर्यंत चालणारा पाणीपुरवठा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत पूर्ण होईल. पाइपलाइनच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणीपुरवठा होईल.
दोन वेळा यशस्वी चाचणी
जुळे सोलापुरातील एमबीआर टाकीवरून पाणीपुरवठा करण्यासाठी गुरुवारी चाचणी घेण्यात आली. प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, उपअभियंता सिद्धप्पा उस्तरगी, चंकेश्वरा, चाकोते, शिंदे, नीलकंठ मठपती आदींनी तपासणी केली.
चार टाक्या सुरू होतील
एमबीआर टाकीतून म्हाडा, एचएसआर, होटगी रोड औद्योगिक वसाहत, कुमठे येथील पाण्याच्या टाकीत पाणीसाठा होईल. सोरेगाव पाइपलाइनऐवजी टाक्यामधून पाणीपुरवठा होईल.
टाकीतून पाणीपुरवठा होईल
एमबीआर टाकीतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षापूर्वी याबाबत प्रयत्न सुरू होते. चार टाक्यामध्ये पाणीसाठवण करून पाणीपुरवठा करता येईल. त्यामुळे वेळेवर आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करता येईल. चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त
चाचणी यशस्वी झाली
जुळे सोलापुरातील दोन एमबीआरपैकी एका टाकीतून चाचणी घेण्यात येत आहे. चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे जुळे सोलापूरसह 20 टक्के भागात सुरळीत आणि वेळेवर पाणीपुरवठा होईल. विजय राठोड, प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता