आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weedi Housing And Jule Solapur Aera Developement Present Today

विडी घरकुल व जुळे सोलापूर परिसराचा विकास आराखडा आज होणार सादर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका आयुक्त कार्यालयात बरेच दिवस अडकलेला विडी घरकुल व जुळे सोलापूर परिसराचा विकास आराखडा बुधवारी नगरसेवकांच्या सभेत खुला होणार आहे. सभेच्या मान्यतेनंतर नागरिकांना हा आराखडा पाहण्यासाठी व त्यातील तरतुदींसंदर्भात हरकती नोंदवण्यासाठी मोकळीक मिळेल.

शहरालगतच्या विडी घरकुल व जुळे सोलापूर या दोन परिसरातील मोठे क्षेत्र म्हाडाने विकसीत केले आहे. 1984 मध्ये या दोनही भागांतील एकूण 300 हेक्टर क्षेत्राचा विकास आराखडा म्हाडाने तयार केला होता. त्याची मुदत 2004 मध्ये संपली. मुदत संपून नऊ वर्षं उलटल्यानंतर दुसरा आराखडा अद्याप मंजूर झालेला नाही.

दरम्यान, म्हाडाने तयार केलेला विकास आराखडा महापालिकेकडे सुपूर्द केला. मुदत संपल्यामुळे नवीन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया 2010 मध्ये सुरू झाली. नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयाने या परिसराचा विकास आराखडा तयार केला असून, तो त्यांनी महापालिका आयुक्तांकडे पाठवला आहे. आता तो पुढील मंजुरीसाठी आयुक्तांनी सभागृहाकडे पाठवला आहे. नगरसेवकांच्या बुधवारच्या सभेत यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.
आराखड्यात सूचवण्यात आलेली आरक्षणे व त्यावरील विविध विकास योजना याबाबत उद्याच्या सभेत चर्चा होऊन नागरिकांना पाहण्यासाठी खुला होणे अपेक्षित आहे. सभागृहाने नेमलेल्या समितीकडे नागरिकांच्या हरकती नोंदवण्यासाठी 30 दिवसांची मुदत असेल.

माझ्याकडे प्रस्ताव आल्यानंतर त्यात काही दुरुस्ती करून शासनाकडे पाठवला होता. शासनाकडून आल्यानंतर मी तो सभागृहापुढे ठेवला आहे.’’ अजय सावरीकर, आयुक्त, महापालिका

दीड वर्षे का पडून होता विकास आराखडा?
नगर रचना खात्याच्या सहाय्यक संचालक कार्यालयाने विकास आराखडा पालिका आयुक्तांकडे सादर केल्यानंतर तो बरेच दिवस तेथेच पडून होता. आराखड्यावर सभागृहाने निर्णय न घेतल्यास मंजुरीसाठी कायद्याने घालून दिलेली मुदत 5 एप्रिल 2013 रोजी संपत आहे. नगरसेवकांच्या सभागृहात आराखडा मुदतीपूर्वी खुला न झाल्यास त्याबाबतचे सगळे अधिकार राज्य शासनाकडे दिले जातील अशी, अटच कायद्याने घातली आहे. जवळपास दीड वर्ष विकास आराखडा आयुक्तांच्या कार्यालयात पडून होता. या अगोदरच आराखडा नगरसेवकांच्या सभेसमोर का आला नाही, याचा उलगडा होणे आवश्यक आहे.