आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Well In The Area Of Solapur Municipal Corporation Acquisition Issue

पालिकेचा ‘बैल गेला आणि झोपा केला’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका प्रशासनाचे कामकाज ‘बैल गेला आणि झोपा केला’ या म्हणीप्रमाणे सुरू आहे. त्याची प्रचिती विहिरींच्या अधिग्रहणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली आहे. उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईवर उपाय म्हणून पुढे आलेल्या योजनेची अंमलबजावणी आता पावसाळ्यात केली जात आहे. तसा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी मंजूर झाला आहे.यास चार कोटी 40 लाख 20 हजार रुपये खर्च येणार आहे.

शहरातील सव्वाशेपेक्षा जास्त विहिरींची पाहणी करून पाणीपुरवठा योग्य विहीर सुचवण्याचे काम व्हीनस इक्युपमेंट अँण्ड इंजिनिअर्स (कोल्हापूर) यांना देण्यात आले. कंपनीने महापालिकेच्या आणि खासगी मालकीच्या 13 विहिरी सुचवल्या. विहिरीतील गाळ काढणे, पाणी उपसा करणे, शुद्धीकरण यंत्रणा बसवणे आदी कामे करून पाणीपुरवठा करण्याचे ठरले. एप्रिलमध्ये ही प्रक्रिया झाली. त्यानंतर लगेच काम हाती घेणे आवश्यक होते. जून संपला तरीही कागदावर काम पुढे सरकले नाही. आता थेट व्हीनस कंपनीला मक्ता देण्यात येत आहे. त्याची प्रक्रिया महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयामार्फत सुरू आहे. पावसाळ्यात एकीकडे लोकांकडून पाण्याची मागणी कमी होते, तर दुसरीकडे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी या योजनेचा उपयोग तसा होणार नाही. मक्ता मंजूर केल्यानंतर महिन्यात काम पूर्ण करावयाचे आहे. जुलैमध्ये मंजुरी मिळाल्यास ऑगस्टमध्ये काम पूर्ण होईल. तोपर्यंत पावसाचे ‘बरेच पाणी पुलाखालून गेले’ असणार आणि पाऊसपाण्यात विहिरींमधून गाळ काढणार कसा, असाही प्रश्न आहे. मक्तेदारास काम दिल्यानंतर एका महिन्यात ते पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे यांनी दिली.

भ्रष्टाचार होण्याची शक्यता
व्हीनस इक्विपमेंटस अँड इंजिनियर्सला शासकीय दरापेक्षा 1 टक्काजादा दराने मक्ता देण्याचा विषय बहुमताने मंजूर झाला आहे. यात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’ सुरेश पाटील, नगरसेवक, भारतीय जनता पक्ष

मक्ता देण्यासाठी धडपड
पावसाळा सुरू असताना विहिरीवर पंपिंग मशिनरी बसवणे, कामाचा मक्ता देण्यासाठी आताच धडपड का? असा प्रo्न विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. त्यास जोरदार हरकत घेतली. त्यामुळे ठराव बहुमताने झाला.

निविदा काढल्या, पण मक्तेदार नाहीत उत्सूक
शहरातील सार्वजनिक आणि खासगी असे 134 विहिरीचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्याचा मक्ता व्हीनस इक्विपमेंटस अँन्ड इंजिनियर्स कोल्हापूर यांना देण्यात आला. त्यांनी 8 मार्च रोजी तो सादर केला. 13 विहिरीवरून पाणीपुरवठा शक्य आहे असा अहवाल दिला. त्यासाठी 4.2 कोटी लागणार आहेत, असे त्यात म्हटले. त्यानुसार काम करण्यासाठी टेंडर काढले असता, कोणी मक्तेदार इच्छुक नाही. शेवटी व्हीनस इक्विपमेंटस अँन्ड इंजिनियर्स कोल्हापूर यांना मक्ता देण्याचे निश्चित केले. आराखडा करणारी आणि मक्ता घेणारी एकच कंपनी आहे.