आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डय़ाविना मंडप उभारणी करण्याकडे वाढतोय मंडळांचा कल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सण, उत्सव, जयंती, लग्नसराई आदीवेळी रस्त्यांवर खड्डे मारून मंडपाची उभारणी होते. यामुळे रस्ते खराब होऊन महापालिकेला दुरुस्तीचा भुर्दंड बसतो. असे होऊ नये यासाठी काही मंडळे खड्डेविना मंडप उभारण्यासाठी पुढाकार घेत आहेत. दुसर्‍या बाजूला सुमारे 60 टक्के मंडळे अजूनही रस्त्यावर खड्डे मारून मंडप उभारत आहेत. सुंदर सोलापूरसाठी सर्वच मंडळांनी खड्डे न करण्याचा संकल्प करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्यावर्षी शहरात 1,297 गणेश मंडळे स्थापन झाली होती. यात सात मध्यवर्ती मंडळे आहेत. 60 टक्केच्या हिशोबाने जवळजवळ 910 मंडळे रस्त्यांवर खड्डे मारून मंडप उभे करतात. रस्ता खराब होण्याची सुरुवात तेथूनच होत असते. पावसाळ्यात रस्त्यांची दयनीय अवस्था असते. खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला प्रिमिक्सवर लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे मंडळांनी पुढाकार घेऊन कैंची किंवा नट बोल्टचे मंडप उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे.


कैंची मडपालाही आहे मागणी
4सध्या मंडप कॉन्ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. त्यासाठी त्या त्या परिसरातील कॉन्ट्रॅक्टरला ऑर्डर मिळते. आमच्याकडे दरवर्षी दहा ते पंधरा ऑर्डर मिळतात. यामधील चार ते पाच मंडप कैंची पध्दतीने असतात. शंकर गवळी, मंडप कॉन्ट्रॅक्टर
समस्यांना वैतागून घेतला निर्णय
4हद्दवाढ भागातील दैनंदिन समस्यांना आम्ही वैतागलो होतो. अशा परिस्थितीत रस्त्यावर खड्डे करणे योग्य नव्हते. म्हणून आम्ही अकरा सोसायट्यांनी मिळून एकच गणपतीची प्रतिष्ठापना केली. जे मंडप उभे करतोय ते सुध्दा विना खड्याचे आहे. श्याम धुरी, ट्रस्टी, ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक-संस्कृतिक मंडळ

नट-बोल्टच्या मंडपाकडे..
सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी शहरात नट-बोल्टच्या मंडळाची पध्दत अंमलात आली. प्रथम याला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. मात्र सध्या लहान लहान मंडळे नट-बोल्टच्या मंडपाकडे आकर्षिले जात आहेत. या मंडपासाठी एकदाच गुंतवणूक असते. एकदा गुंतवणूक केली की दरवर्षी मंडपासाठी होणार्‍या खर्चाची बचत होते.

‘ओम गर्जना युवा शक्ती’चा स्तुत्य संकल्प
सैफुल भागात ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक- सांस्कृतिक मंडळाची सात वर्षांपूर्वी स्थापना झाली. सैफुल हा भाग हद्दवाढ भागात येतो आणि हद्दवाढ भागात रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. हद्दवाढ भागात दैनंदिन सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे मंडप उभारण्यासाठी खड्डे मारले की आहे ते रस्तेही खराब होतील या विचाराने मंडळाने स्तुत्य संकल्प केला. सात वर्षांपासून हे मंडळ हा संकल्प जपत आहे.

महापालिकेची ठोस भूमिका नाही
लग्नसराईसाठी रस्त्यावर खड्डे केले की महापालिका संबंधितांवर दंडात्मक कारवाई करते. मात्र, उत्सवदरम्यान ही कारवाई थंडावते. यावेळी भावनात्मक विचार करून अधिकारी शांत बसतात. अशामुळे रस्त्यांची मात्र दयनीय अवस्था होते. महापालिकेचे विद्यमान आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यपध्दतीचा अनेकांनी धसका घेतला आहे. ते खड्डे विरोधी कुठली मोहीम राबवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आले गणराया..
शहरातील सुमारे चाळीस टक्के गणेशोत्सव मंडळे मंडप उभारणीसाठी मारत नाहीत खड्डे, सुंदर सोलापूरसाठी रस्त्यांवर खड्डे न मारण्याचा संकल्प घेण्याची गरज