आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन किलोमीटरवरून उडालेल्या बंदुकीच्या गोळीने महिला ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुर्डुवाडी - चिंकहिल (ता.माढा) येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ ) केंद्रात गोळीबार सराव सुरू आहे. सराव केंद्राच्या संरक्षित क्षेत्राबाहेर उडालेली बंदुकीची गोळी एक महिलाच्या पाठीत घुसून ती जागीच ठार झाली. गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. प्रशिक्षण केंद्रामागे अकुलगाव शिवारात ही घटना घडली. मयुरी धनराज अस्वरे (वय 27, रा. अकुलगाव, ता.माढा) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोळीबार सरावाप्रसंगी अशा घटना अनेकदा घडल्याने प्रशिक्षण अधिकार्‍याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाइंने केली आहे.

यापूर्वी घडलेले प्रकार
12 डिसेंबर 2012
- प्रभावती नारायण निंबाळकर (वय 50),

10 डिसेंबर 2012
- प्रतिभा खंडू बोबडे, प्रशांत राजाराम जगताप (वय 27), रऊफ रहिमान काझी (वय 30) हे जखमी झाले.

10 वर्षांपूर्वी
- प्रशांत नारायण बस्के हा सातवीमध्ये शिकताना गोळी लागून जखमी झाला होता. तर हरिदास मुरलीधर खुणे यांचा एक बैल मेला.

पक्क्या भिंतीचा निधी पडून
केंद्राच्या पाच किलोमीटर परिसरातील गावांमध्ये दवंडी दिली जायची. तसेच तेथे सूचना फलक लावून केंद्राच्या परिसरात सुरक्षारक्षक नेमले जात. परंतु गुरुवारी तसे करण्यात आले नाही. तसेच केंद्रामध्ये मातीची सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. मात्र, पक्की भिंत बांधण्यात आली नाही. यासाठी मंजूर निधी पडून आहे.

अन्यथा आंदोलन छेडणार
गोळीबार सराव करताना अनेकजण जखमी झाले. केवळ उपाययोजना न केल्याने या घटना घडत आहेत. उपाययोजना करेपर्यंत गोळीबार सराव बंद ठेवावा. हयगय केलेल्या अधिकार्‍याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन छेडू. बापूसाहेब जगताप, रिपाइंचे नेते, कुर्डुवाडी

बंदुकीची गोळी लागूनच महिलेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संबंधित अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. शिवाजी सोनवणे, पोलिस निरीक्षक, कुडरुवाडी

उपचारापूर्वीच सोडला प्राण
1 गुरुवारी सकाळी मयुरी अस्वरे या शेतातील वस्तीसमोर दात घासत बसली होत्या. पती धनराज अस्वरे बाहेरच होते. मयुरी यांनी जोराची किंकाळी मारल्याने ते धावत आले.
2 त्यांच्या पाठीतून मोठा रक्तस्त्राव होत होता. आरडाओरडीमुळे शेजारच्या वस्तीवरील शिरीष ठेंगल व साहेबराव शिंदे तेथे आले. दोन किलोमीटर अंतरावरील आरपीएफ प्रशिक्षण केंद्रात गोळीबार सरावाचा आवाज येत होता. त्यामुळे त्यांनी गोळी लागली असावी म्हणून धनराज यांनी त्यांच्या मदतीने मोटसायकलवरून मयुरी यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.
3 दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांनी ती मृत्यू पावल्याचे सांगितले. पूर्वसूचना व सराव क्षेत्राबाहेर गोळी उडणार नाही, याची दक्षता घेतली नसल्याचे फिर्यादीत धनराज अस्वरे यांनी म्हटले आहे.

गोळी बरगडीतून दंडात
मयुरी यांच्या पाठीवरील बरगडीच्या डाव्या बाजूस गोळी लागली. पाठीतून तिरकी शरीरात घुसून डाव्या दंडामध्ये शिरल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पती धनराज अस्वरे, मुलगी प्रगती (वय सात), मुलगा करण (वय पाच), सासू व सासरे असा परिवार आहे. सुरक्षा बलाच्या बेफिकीर सरावामुळे दोन लहान मुले पोरकी झाली.

2 कि.मी.चे क्षेत्र ओलांडते गोळी
एके-47 : या गनमधून उडालेली गोळी 2 कि.मी.वरचा वेध घेते. एलएमजी गन : या गनमधून गोळी 4 कि.मी.वरचा वेध घेते. एसएलआर गन : या गनमधून उडालेली गोळी 6 कि.मी.वरचा वेध घेते. मुकुंद शिवशरण, निवृत्त नाईक, भारतीय लष्कर