आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला टँकरच्या धडकेने महिला ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वसंत पंचमीनिमित्त मार्डी येथे देवदर्शनासाठी पतीसोबत जाताना टँकर -दुचाकी अपघातात एका विडी कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास बाळेजवळील नवीन पुलाजवळ हा अपघात झाला. पद्मावती व्यंकटेश दिकोंडा (वय 42, रा. विडी घरकुल जी ग्रुप-14-62, सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

व्यंकटेश दिकोंडा यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दिकोंडा हे दुचाकीवरून (एमएच 13 एआर - 0251) पत्नी पद्मावती व मित्राचा मुलगा असे तिघेजण मार्डीला जात होते. बाळेच्या नवीन पुलाजवळ बाजूने जाणा-या टँकरचा (एमएच 04 सी 278) भाग दुचाकीचा हँडलला धडकला. त्यामुळे पद्मावती या उजव्या बाजूने पडल्यामुळे टँकरच्या मागील चाकाखाली चेंगरल्या. दोघेजण डाव्या बाजूने पडले. पद्मावती यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार शिंदे तपास करीत आहेत.


वाहतुकीची कोंडी
बाळे पुलाचे काम सुरू असल्याने बाजूने कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यावरून अनेक वाहने ये-जा करतात. अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली. दोन तासांनंतर ती सुरळीत झाली.


दिकोंडा परिवारावर शोककळा
पद्मावती यांच्या मृत्युमुळे दिकोंडा परिवारावर शोककळा पसरली होती. शासकीय रुग्णालयात जमलेल्या परिवारातील सदस्यांसह नातेवाइकांना अश्रू आवरता आले नाहीत. पद्मावती यांचे पती व्यंकटेश हे टेक्स्टाईल कंपनीत वार्पर म्हणून काम करतात. मुलगा नितीन, मुलगी नंदिनी बारावीत शिकत आहेत. प्रशांत हा मुलगा व्हीव्हीपी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे. पद्मावती या विडी कामगार होत्या.