आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक हिंसाचार; स्वरूप भडक्याचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्वयंपाक करताना स्टोव्हचा भडका, सासरी होणार्‍या छळास कंटाळून पेटवून घेतले, चूल पेटवताना पदर पेटल्याने महिला भाजली, तरुणीवर एकतर्फी प्रेमातून अँसिड हल्ला, विद्युत शॉक बसून भाजला या घटना समाजात घडतात. सोलापुरात या प्रकरणाची संख्या थोडी मोठीच आहे. शासकीय रुग्णालयात किमान दररोज दोन रुग्ण भाजल्यामुळे उपचारासाठी दाखल होतात. महिनाभरात किमान चारजण मरण पावतात. अन्य शहरातील म्हणजे उस्मानाबाद, लातूर, बिदर, विजापूर, गुलबर्गा या शहरातील रुग्ण सोलापुरात येत असल्यामुळे आकडेवारी फुगल्याचे वास्तव आहे.

महिलाच का बळी पडतात?
भाजल्यामुळे महिलांचा सर्वाधिक मृत्यू होतो. सासरी होणारा त्रास, त्यातून पेटवून देणे किंवा सहनशीलता संपल्यामुळे आयुष्याचा शेवट करून घेणे हा पर्याय महिला निवडतात. ही बाब चुकीची आहे. आत्महत्या किंवा पेटवून घेणे हा अंतिम मार्ग नाही. आलेल्या परिस्थितीवर मात करून सकारात्मक पद्धतीने वाटचाल करणे गरजेचे आहे. क्षणिक राग आला तरी त्यावर शांत राहून आपल्या जीवनाचा मार्ग निवडावा. टोकाची भूमिका घेण्यात काहीच फायदा नाही.

महिला अत्याचारात वाढच
स्टोव्हचा भडका उडून महिलेचा मृत्यू, तरुणीवर अँसिड फेकले, या घटना आपण नेहमी वाचतो, पाहतो.स्वयंपाकासाठी अलीकडे स्टोव्हचा वापर कमी होत असतानाही स्टोव्हच्या भडक्याने भाजल्याची नोंद पोलिस ठाण्यात केली जाते. कौटुंबिक अत्याचाराला एखादी महिला कंटाळून आत्महत्येचा मार्ग निवडते. पण, याला भडका उडून घटना घडल्याचे नाव दिले जाते. घटना घडल्यानंतर जखमींचा जबाब घेणे, घटना नेमकी कशामुळे घडली, चार्जशिट दाखल करणे आदी प्रकारांत उदासीनता दिसून येते. त्यामुळे न्यायालयातही अशा प्रकरणात निदरेष सुटण्याचे प्रमाण अधिक आहे. या घटनाच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची गरज आहे.

त्वचा प्रत्यारोपणामुळे दिलासा
भाजलेल्या रुग्णांवर त्वचा प्रत्यारोपण उपयोगी ठरू शकते. ब्लड बँकेप्रमाणे मुंबईत स्कीन बँक आहे. निरोगी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याची स्कीन काढून घेता येते. (ज्यांना दुर्धर आजार नाहीत) शून्य अंश तापमानाखाली त्वचा ठेवून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून ती त्वचा जळीत रुग्णावर प्रत्यारोपण होते. परदेशात एखाद्या व्यक्तीची काही भागाची त्वचा चांगली असल्यास त्या आधारे पॅथालॉजीमध्ये त्याच पद्धतीची स्कीन तयार करून त्याच रुग्णावर ती वापरली जाते. भारतात अजून अशी सोय नाही. त्वचा दान करण्याची पद्धत आता समाजात रूजतेय. ती चळवळही मोठय़ा प्रमाणात पुढे येत आहे. कुणीही व्यक्ती त्वचा दान करू शकते. त्यासाठी डोळे दान, देहदान करताना जी पद्धत (नोंदणी करणे) आहे, त्याप्रमाणे त्यालाही नोंदणी पद्धत आहे. ’’ डॉ. गुणवंत चिमणचौडे, प्लास्टिक सर्जन

तोंडी, लेखी जबाब महत्त्वाचा
महिला पेटवून घेतली किंवा भाजली असेल तर तिचा तोंडी, लेखी जबाब महत्त्वाचा मानला जातो. घटना घडल्यानंतर शेजारी, नातेवाईक,डॉक्टर यांच्यासमोर पीडित महिला जी काही माहिती देईल ते ग्राह्य धरले जाते. उपचाराला दाखल केल्यानंतर तहसीलदार दर्जाचा अधिकार्‍यांसमोर दिलेला लेखी जबाब न्यायालयात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. तोंडी जबाबही तेवढाच महत्त्वाचा असतो. पोलिसांनी तत्काळ नातेवाईक, शेजारील लोकांचा जबाब घ्यावा, अन्यथा त्यांनीच पोलिसांना घटनेची माहिती दिल्यास तोही पुरावाच मानला जातो. लहान मुलांची साक्षही अनेकदा महत्त्वाची ठरते. ’’ अँड. डी. के. लांडे, ज्येष्ठ विधिज्ञ

चुकीच्या पद्धतीमुळे अपघात
स्वयंपाक गृहातील चुकीची रचना, विद्युत उपकरणातील नादुरुस्ती, गॅस लिकेजमुळे भाजण्याचे प्रमाण जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आशिया खंडातील शहरात दरवर्षी दीड ते दोन लाख असे भाजण्याचे अपघात होतात. अंदाजे एक लाखाहून अधिक लोकांचा यात जीव जातो, असे अभ्यासक, तज्ज्ञ सांगतात.

जखमींमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण दुप्पट
विवाहीत महिलेचा सासरी छळ होत असेल. लग्नाला किमान सातवर्षे झाली असतील. महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला तर हुंडाबळीचा भक्कम पुरावा उभा राहतो. यातील संशयित आरोपीला किमान तीन ते सातवर्षे शिक्षा मिळते. अनेकदा दुर्घटना पाहणारे नेत्र साक्षीदार नसतात. त्यावेळी पुरावा वेगळया पद्धतीने सिद्ध करण्यात येतो. पोलिसांचा तपास योग्य पद्धतीनेच होतो.’’ तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक