आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडी व घरेलू कामगार महिलांनी शिक्षणासाठी बांधला चंग !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शिकण्याच्या वयातच अनेकांच्या जीवनात बालकामगाराचं जगणं आलेल. त्यामुळेच शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या शंभरहून अधिक महिलांनी पदवी शिक्षणाकडे आपली नजर वळविली आहे. अल्पशिक्षित असलेल्या विडी व घरेलू कामगार महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी ‘विशाखा’ने विशेष प्रयत्न केले आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात त्यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. परंतु आर्थिक कारणामुळे अनेकजणांची इच्छा असूनही शिक्षणाच्या अमृतापासून दूरच राहतात. उपजीविकेचं साधन म्हणून घरेलू कामगार, विडी कामगार म्हणून काम करणार्‍या महिलांना वयाच्या चाळिशीत पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न विशाखा संस्थेने केला आहे. अल्प शिक्षण झालेल्या बचत गटांतील सर्व महिलांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी.ए.च्या शिक्षणासाठी प्रवेश घेता यावा, यासाठी त्यांना पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी मदत केली. विशाखा संस्थेच्या संचालिका व माजी महापौर नलिनी चंदेले यांनी यासाठी पुढाकार घेतला. महिलांसाठी विशेष शिक्षक व त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च या सर्व गोष्टींची जबाबदारी विशाखाने घेतली आहे. 120 महिलांनी बी.ए.साठी मुक्तविद्यापीठाकडे प्रवेश घेतला आहे.

60 वर्षांच्या आजींनी धरली शिक्षणाची वाट
सुधा जाधव या साठीतील महिलेनेही मुक्त विद्यापीठामार्फत पदवी शिक्षण घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी त्या दिवसभर हाती पडेल ते काम घरेलू कामगार म्हणून करीत. या वयात त्यांनी पुन्हा शिक्षणाचा र्शीगणेशा सुरू केला आहे.

शिक्षण घेण्या-साठी जेव्हा वय होते तेव्हा परिस्थिती नव्हती. आता वय नाही, पण तरीही आम्ही शिकणार आहोत.’’ उज्ज्वला पुजारी, महिला विद्यार्थी
शिक्षण घेण्याचा योग नशिबानेच मिळतो. तो आता आमच्या नशिबी आला आहे. त्याचा आनंद घेणार आहे.’’ साबेरा शेख, महिला विद्यार्थी
शिक्षणापासून वंचित असलेल्या महिलांना शिक्षणाचा आनंद व त्या बळावर स्वावलंबन देण्याचा प्रयत्न करीत आहोत.’’ नलिनी चंदेले, संचालक, विशाखा
मुलांसह देणार परीक्षा
या परीक्षेसाठी बसलेल्या अनेक जणींची मुले ही सध्या पदवीचे शिक्षण घेत आहेत. अशावेळी स्वत:ची शिक्षणाची आत्मीक ओढ जिवंत ठेवून त्या आता मुलांसोबतच अभ्यासाला लागल्या आहेत.
रविवारी करणार क्लास
आठवडाभर काम करून दर रविवारी आपले शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्या ‘क्लास’ला हजेरी लावणार आहेत. विशाखा संस्थेच्या वतीने दर रविवारी या महिलांचे क्लास घेतले जाणार आहेत. त्यांना विषयांच्या नियोजनानुसार मार्गदर्शन दिले जाणार आहे.