आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - महापालिकेच्या 2012-13 च्या अंदाजपत्रकात टँकरने पाणीपुरवठय़ासाठी 50 लाखांची तरतूद होती. त्यापैकी सुमारे 22 लाख 19 हजार रुपये कमी खर्च झाल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाकडे आहे. याउलट मुख्य लेखापाल कार्यालयात मात्र त्यापेक्षा जास्त खर्चाची नोंद झाल्याचे दिसून आली. दोन कार्यालयातील खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याचे चित्र आहे.
आरोग्य अभियंता अंधारात
शहरात किती टँकर आहेत, याची सविस्तर माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाकडे नाही. झोनकडे बजेट असल्याने त्या कार्यालयात माहिती आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय याबाबत अंधारात आहे.
डिझेलमुळे गोंधळ
महापालिका आणि खासगी टँकरला डिझेल पुरवठा महापालिकेकडून होतो. डिझेल खर्चाची नोंद सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयात नाही. त्यामुळे पाण्यासाठी नेमकी किती रक्कम खर्च झाली, ते बजेट मीटिंगमध्ये समजून येत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
गळतीवर चर्चा
कर संकलन, एलबीटी, मिळकती, पाणीपुरवठा आदी विभागात गळती दिसून येत आहे. यावरून पक्षांच्या बैठकांमध्ये प्रशासन व नगरसेवकांत खडाजंगी होत आहे. उत्पन्न वाढीच्या समितीचा अहवाल धूळखात पडून आहे.
‘सर्व शिक्षा’चा हिशेब द्या
शिक्षण मंडळ सभापतींसाठी नवीन गाडी घेण्यासाठी तरतूद होण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाकडून सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत झालेल्या खर्चाची माहिती शिक्षण मंडळाकडे नसल्याचे दिसून आले. हिशेब दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश आहेत.
प्रशासन कोंडीत सापडणार
बजेट सभेत प्रशासनाला सत्ताधारी व विरोधक कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. यंदाचे बजेट दोन दिवस चालणार असल्याने नगरसेवकांना उत्तरे देताना प्रशासनाच्या नाकीनऊ येण्याची शक्यता आहे.
मान्यता घेतली आहे
टँकरच्या प्रत्येक खेपेस कार्यालयाकडून 120 रुपये दिले जातात. त्यानुसार टँकरचालकांना आतापर्यंत 27.81 लाखांचे बिल अदा झाले. बजेटपेक्षा जास्त रकमा मागील तीन महिन्यांत पडल्या. त्यासाठी सभागृहाची मान्यता घेण्यात आली आहे. डिझेलचा खर्च आमच्या कार्यालयाकडून होत नाही. बी. एस. आहिरे, सार्वजनिक आरोग्य अभियंता
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.