आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Customer Day Celebrate At Solapur But No Response

ग्राहक दिन मेळावा; नागरिकांची पाठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शासन आदेशाच्या पालनाची औपचारिकता पार पाडण्यासाठी साजरा केल्या जाणार्‍या ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित शासकीय कर्मचारी, रेशन दुकानदार आणि रॉकेल परवानाधारक यांच्यामध्येही गांभीर्याचा अभाव दिसून आला. कुजबूज वाढल्याने नाईलाजास्तव जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना शिपायामार्फत शांत राहण्याचा संदेश कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचवावा लागला.

ज्या शासकीय कार्यालयाकडून नागरिकांना त्रास आणि लुबाडणूक होते. त्याच शासकीय कार्यालयाच्या कर्मचार्‍यांच्यासमोर ग्राहक दिनाचे फक्त गोडवे गाऊन काहीही साध्य होणार नाही. ग्राहक दिनाच्या दिवशी ग्राहकांच्या तक्रारी घेऊन ऐकल्या जाव्यात आणि त्याच दिवशी संबंधित संस्था, शासकीय कार्यालयाविरोधात काही ठोस कारवाई व्हावी. तरच ग्राहक दिनासाठी ग्राहक वेळ काढून येणार आहे. अन्यथा ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत, अशांसमोरच तक्रारी मांडायच्या असतील तर कोणी ग्राहक येणार नाही.

24 डिसेंबरला राष्ट्रीय आणि 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याची औपचारिकता गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडून पार पाडली जाते. बाजारात ग्राहकांची होणारी फसवणूक तर सोडाच पण प्रत्यक्षात आरटीओ, पोलिस खाते, दस्त नोंदणी, रेशन व्यवस्थेसह अनेक शासकीय कार्यालय आणि संस्थांमधून नागरिकांची होणारी लुबाडणूक थांबवण्याकडे जिल्हा प्रशासन का दुर्लक्ष करते, हे गुलदस्त्यात आहे.

रंगभवन सभागृहाच्या भोजन कक्षात गुरुवारी ग्राहक दिन साजरा करण्यात आला. अन्न व औषध, वजनमापे, बीएसएनएल, एसटी, आरटीओ, शहर वाहतूक शाखा आदींनी प्रदर्शन भरवून ग्राहकांमध्ये जागृतीचा प्रयत्न केला.

ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी शशीकांत हरिदास आणि शोभना सागर यांनी चळवळीचा इतिहास व महत्त्व सांगताना चळवळीचेच गुणगान गायले, पण शासकीय कार्यालयात ग्राहकांच्या होणार्‍या लुबाडणुकीबद्दल मात्र ते काहीच बोलले नाहीत. तक्रार करा, तक्रार पुस्तिकेत नोंद करा, असे उपदेश करत ग्राहकांनाच दोषी ठरवण्यात आले. एफडीओ संतोष भोर यांनीही अध्यक्षीय भाषणात सांगितले की, नेहमीप्रमाणे ग्राहक दिनाचे कार्यक्रम होतील, त्याला अर्थ नाही. ग्राहक संरक्षण कायद्याची कायमस्वरुपी अंमलबजावणी झाली पाहिजे. रेशन दुकानात धान्य व रॉकेल मिळत नसेल तर त्याला झोन व पुरवठा अधिकारी जबाबदार आहेत.