आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहर पर्यावरणासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा- डॉ. वासुदेव रायते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज पाच जून. जागतिक पर्यावरण दिन! या सुमंगल दिवशी आपल्या परिसरात बंदिस्त मैदानात संरक्षित ठिकाणी जलस्रोताजवळ शक्य असेल तर वड, पर्जन्य वृक्ष किंवा जांभूळ, आंबा, चिक्कू, चिंच, अशी झाडे नियोजनपूर्वक लावली जावीत. त्यांची जाणीवपूर्वक जोपासना केली पाहिजे. आपण सर्वांनी पुढे येऊन हे करू. हे मानवतेचे काम आहे.

वृक्षपूजा हीच ईश्वरपूजा. झाडे लावा आणि मानव जागवा. पर्यावरणाचा विकास हाच सर्वांगीण विकास. आपण सर्व एक होऊ, वसुंधरेला हरितगर्भ करू. लोककल्याणासाठी समर्पित होऊन हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे. महाराष्ट्राचे वाढलेले तापमान, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अनिश्चित हवामान या दुर्घटना निश्चितच वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्याशी संबंधित आहेत. हे रोखण्यासाठी वृक्षलागवड अनिवार्य आहे. हे काम नियोजनपूर्वक आणि युध्दपातळीवर प्राधान्याने करायला हवे.

पावसाआधी सर्वेक्षण करून सुयोग्य जागा निवडावी. बंदिस्त मैदाने, संरक्षित कार्यालये, पाण्याची उपलब्धता, जनावरांपासून संरक्षण, सहज वाढणाऱ्या वृक्षराजी, प्रजाती असा सर्वांगीण विचार करून झाडे लावावीत. वृक्षमित्र, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमींचे संरक्षण दल उभे करून संगोपन करावे. या सर्व कामी महापालिका सामाजिक वनीकरण विभाग यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले पाहिजे. तसेच, प्रत्येकाने या रचनात्मक सत्कार्यात सहभागी व्हावे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबेलच, पण वसुंधरा हरितगर्भ होईल.

वरचेवर सोलापूरचा उन्हाळा असह्य होऊ लागला आहे. तापमान वाढतच चालले आहे. पुढील प्रत्येक वर्षी उन्हाळा सुसह्य व्हावा यासाठी सार्वजनिक बागेत, मोकळ्या मैदानात, रस्त्याच्या कडेला पर्जन्यवृक्ष गुलमोहोर, कडुनिंब यासारखे कमी पाण्यावर वाढणारे वृक्ष लावणे गरजेचे आहे. चाफा, सप्तपर्णी यासारखे वृक्ष शहराच्या सौंदर्यात भर घालतील. ते वृक्ष लावावेत. त्यासाठी आवश्यक पूर्वनियोजन पावसाळा सुरू होण्याअगोदरपासूनच करायला हवे. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. आताच नियोजन करता येऊ शकते. त्यासाठी वृक्षप्रेमींची बैठक तातडीने बोलावून सुयोग्य निर्णय घ्यावा. तुमची दूरदृष्टीअनेकांचे कल्याण करेल. त्यासाठी परिपूर्ण कृती अपेक्षित आहे.

सोलापूरचा उन्हाळा असह्य होत चालला आहे, वृक्ष लागवड कमी झाली आहे. त्या अनुषंगाने कोणतेही नियोजन नाही. पावसाळा सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि सामाजिक वनीकरण विभागाने पुढे आले पाहिजे.