आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Heritage Day : Let's Conserve Heritage Site

जागतिक वारसा दिन : वारसा जतन करण्यासाठी पावले उचलू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मनपामध्ये हेरिटेज कमिटी नियुक्तीचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रिपन हॉलमधील वस्तू संग्रहालयदेखील वास्तवात आलेले नाही. डॉ.कोटणीस यांचे जन्मस्थान चांगल्या पद्धतीने स्मारक रूपात पुनर्जिवित केले असले तरी नागरिकांना त्याची माहिती नाही. लक्ष्मी मंडई व शासकीय रुग्णालयातील ‘बी ब्लॉक’ची ऐतिहासिक इमारत पाडण्याचा चुकीचा प्रस्ताव समोर आला आहे. शहरातील समृध्द ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी ‘ऐतिहासिक वारसा जतन दिना’चे औचित्य साधून सर्वांनी मिळून सकारात्मक पाऊल टाकणे गरजेचे आहे.

सोलापूरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिध्द असलेले श्री सिध्देश्वर हे बाराव्या शतकातले कवी. सिद्धयोगी अन् समाजसुधारक. त्यांच्या प्रेरणेने दुष्काळात अनुयायांनी तलाव खोदला. त्याभोवती सोन्नलगी खेडे सोलापूर नावाने विकसित झाले. किल्ल्यातले कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर प्रत्यक्ष सिद्धेश्वरांच्या काळातले मानले जाते. बाळीवेसेतील मल्लिकार्जुन मंदिर, पद्मा टॉकीजजवळचे सिद्धेश्वर मंदिर त्यानंतरच्या शतकातील असावे.
महापालिकेस नाही आली जाग
नगर विकास मंत्रालयाने 30 सप्टेंबर 2000 मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार प्रत्येक शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, यासाठी एक तज्ज्ञ मंडळींची कमिटी तयार केली जाते. वास्तूंच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करणे आवश्यक असते. परंतु महापालिकेस आजपर्यंत जाग आलेली नाही.

सृजनांच्या पुढाकाराची आशा
कौशल्यपूर्ण व परंपरेचा समृध्द ऐतिहासिक वारसा सोलापूरकरांना व पर्यटकांना माहिती होणे, त्यांची देखभाल करणे. आजच्या काळाशी सांगड घालून या वास्तू निरंतर उपयोगात ठेवणे आवश्यक आहे. सोलापूकर नागरिक, इतिहासप्रेमी, प्रशासक, अभ्यासक, राज्यकर्ते त्यासाठी पुढाकार घेतील?

1818 मध्ये पेशवे अन् ब्रिटिशांची निर्वाणीची लढाई सोलापूर किल्ल्यात झाली. कोटणीस बंगला, गोगटे बंगला, पागे बंगला, जिल्हाधिकारी बंगला अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण निवासी वास्तू त्याकाळी बांधल्या गेल्या. टपाल कार्यालय, जिल्हा रुग्णालय, धनराज गिरजी रुग्णालय, लक्ष्मी मंडई, रिपन हॉल, नॉर्थकोट हायस्कूल, ह.दे.प्रशाला, व्होरोनोको शाळा, संगमेवर व दयानंद कॉलेज अशा अनेक वास्तू बांधल्या गेल्या.

चाळींच्या इमारतीही बोलक्या
गिरणी कामगारांसाठी व मध्यमवर्गीयांसाठी काडादी, माणिकचंद, वडगावकर, गोगटे चाळ, चांडक बगीचा, नरसिंग गिरजी कामगार वसाहती व गिरण्यांच्या इमारती, अधिकर्‍यांच्या निवासी वास्तू बांधल्या गेल्या. भागवत थिएटर समूह, पद्मा, सेंट्रल, लक्ष्मी, आशा, मीना, श्रीगणेश, प्रभात असे चित्रपटगृहे अस्तित्वात आली. सर्वार्थाने हे महागनर म्हणून उदयाला आले. यासर्व इमारती बोलक्या आहेत.