आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे येथून निकालापूर्वीच दहावी हिंदी विषयाची उत्तरपत्रिका गहाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - दहावीच्या परीक्षा झाल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली आहे. येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात हिंदीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आल्या आहेत. त्यापैकी शिक्षकाकडून एक पेपर गहाळ झाल्याचा गंभीर प्रकार 16 मार्च रोजी घडला. मुख्याध्यापकांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप संबंधित शिक्षकाविरुद्ध कारवाई झालेली नाही.
नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत कॉपीमुक्त अभियान मोडीत काढत विद्यार्थ्यांनी कॉपी केली; परंतु आता उत्तरपत्रिका तपासणीतही हलगर्जीपणा होत आहे. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या शिवाजी माध्यमिक विद्यालयात हिंदी विषयाची पेपर तपासणी सुरू असताना शनिवारी (दि.16) शिक्षक एस. टी. गोरे यांच्याकडून एक पेपर गहाळ झाला आहे. तपासणीनंतर गठ्ठा बांधताना एक पेपर गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. शोधाशोध करूनही उत्तरपत्रिका सापडला नाही.
परीक्षेचा पेपर गहाळ होणे ही गंभीर बाब आहे. मुख्याध्यापक एन. पी. देवरे यांनी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

नि:पक्ष चौकशीची आवश्यकता
दहावीच्या प्रत्येक पेपरवर बारकोड असल्यामुळे कोणत्या विद्यार्थ्याचा पेपर हरवला आहे, हे समजणे अशक्य आहे. पेपर गहाळ झाला किंवा कसे हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. शिवाजी विद्यालयात पेपर आले त्याआधीच पेपर गहाळ झाला होता की शिक्षकाकडून गहाळ झाला, हे पाहणेदेखील आवश्यक आहे.