आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Cheated By Organization In Name Of Employment

नोकरीसाठी तरुणांची फसवणूक; संस्थाध्यक्षांसह 6 जणांवर गुन्हे दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी- नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या संस्थाध्यक्षासह सहा जणांवर वैराग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना 2011 ते डिसेंबर 2012 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी वैराग पोलिसांनी या चौघांना गजाआड केले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वैराग येथे कै.भगवानदादा निवासी मतिमंद निवासी शाळा आहे. यातील संशयित आरोपी प्रकाश रामचंद्र खरटमोल हा या संस्थेचा अध्यक्ष आहे. त्याने व संचालक मंडळातील अन्य संशयित आरोपी आशा प्रकाश खरटमोल, सुरेश विठ्ठल खरटमोल, बाबासाहेब रामचंद्र खरटमोल (सर्व रा.नेहरू चौक वैराग) तसेच सचिन क्षीरसागर व शिरीष शिंदे (दोघे रा. बार्शी) यांनी शेरखान इब्राहिम पठाण (वय 22 रा.कुडरू ता. माढा) आदींना सदर संस्थेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून 2 लाख 60 हजार रुपये घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी न देता फसवणूक करून त्यांना खोटे चेक दिले, अशी फिर्याद शेरखान पठाण यांनी दिली आहे. पोलिसांनी सदर आरोपींवर गुन्हा दाखल करून आरोपी सुरेश खरटमोल, बाबासाहेब खरटमोल, सचिन क्षीरसागर, शिरीष शिंदे या चौघांना अटक केली. आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यातील मुख्य आरोपी प्रकाश खरटमोल व त्याची पत्नी आशा खरटमोल हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सातारा, सांगली, नांदेडमध्येही फसवणुकीचे प्रकार

दरम्यान, या संस्थापकाने व त्याच्या टोळीने सातारा, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद या भागातही सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याची माहिती उजेडात येत आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या फसवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही प्रकार समोर येतील. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कदम करत आहेत.