आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात हास्यरंगाची उधळण; तरुणाई हास्यरसात चिंब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमंगलनगरी- मुक्तांगण व्यासपीठावरून सोमवारी दुपारपासून हास्यांचा धबधबा सुरू झाला तो थांबेचना. विविध महाविद्यालयांतील हरहुन्नरी कलाकारांच्या नकला, एकपात्री पाहून तरुणाई हास्यरसात चिंब झाली.

सोलापूर विद्यापीठाचा दहावा युवा महोत्सव लोकमंगल जैवतंत्रज्ञान महाविद्यालय (वडाळा, ता. उत्तर सोलापूर) गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. शहर व ग्रामीण भागातील 38 महाविद्यालयांच्या संघांनी यात सादरीकरण केले. वालचंद महाविद्यालयाची र्शद्धा हुल्लेनवरू हिने अफलातून शो सादर केला. टीव्हीवरील रिमोट वारंवार बदलण्याचा ट्रेंड घरोघरी सुरू आहे. त्यातून काय-काय विनोद निर्मिती घडू शकते हे तिने चार मिनिटे 20 सेकंदांच्या कालावधीत उत्तमपणे सादर केले.

शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाच्या (अकलूज) विवेकानंद गमे-पाटील याने पत्रकार निखिल वागळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार, अण्णा हजारे, रामदास आठवले, अजित पवार आदी नेते मंडळींच्या आवाजांची नक्कल सादर केली. देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयाचा जयराम गावडे याने निळू फुले व दादा कोंडके यांच्या आवाजात नक्कल सादर केली. एच. एन. वाणिज्य महाविद्यालयातील मारुती मंठाळकर याने प्राणी, मांजर, गाढव यांचे आवाज काढून दाखविले.

उपस्थित रसिक विद्यार्थीही प्रतिसाद देत तसाच आवाज काढत होते. त्याने हास्यांचा धबधबाच उसळत राहिला. के. बी. पी. महाविद्यालयाच्या (पंढरपूर) प्रथमेश पाटील, शिवाजी महाविद्यालयाच्या (बार्शी) पारस कांबळे, संगमेश्वर महाविद्यालयाची एकता तुळजापूर यांचे भन्नाट सादरीकरण झाले. मिमिक्रीच्या कार्यक्रमानंतर एकपात्री स्पर्धा सुरू झाली. त्यातही सादरीकरणाच्या विविध छटा सादर झाल्या.