आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीयवादी शक्ती बळावत आहेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- देशातील सर्वच तरुण समान आहेत. काँग्रेसने समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आणि दुफळी निर्माण केली. वर्णव्यवस्थेला प्राधान्य आणि चालना दिली. तसेच केंद्रात मोदी सरकार आल्यानेही देशात अनेकांचा उन्माद वाढला आहे. अदानी, अंबानी यांसारख्या उद्योगपतींनी मोदी सरकार आल्यावर परिवर्तन होईल, अशी चित्रे दाखवली आहेत, काय होईल ते पाहू. देशात जातीयवादी शक्ती बळावत आहेत, विटंबनेचे प्रकार रोखण्यासाठी योग्य उमेदवारास निवडून दिले पाहिजे, असे विचार भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे राज्य अध्यक्ष भगवान भोजने यांनी मांडले.
शिवछत्रपती रंगभवन येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी माजी आमदार नरसय्या आडम, जिल्हाध्यक्ष अजिज पटेल, नगरसेवक माशप्पा विटे, नगरसेविका सुनंदा बल्ला, कुरमय्या म्हेत्ने, युसूफ मेजर, अँड. रफीक शेख, हसन शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी बोलताना भोजने म्हणाले, ‘देशातील सव्वाशे कोटी जनतेसाठी संस्थेचे सव्वा कोटी सभासद कार्य करतील.’ या वेळी डीवायएफवाय सोलापूर जिल्हा कमिटी व गोदूताई घरकुल तालुका कमिटीचे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. एम. एच. शेख यांनी प्रास्ताविक केले.
युवकांचा जल्लोष
सभागृहात केवळ 18 ते 25 वयोगटातील युवकांचा सहभाग होता. केवळ युवक आणि युवतींनी सभागृह खचाखच भरले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी युवकांनी ‘लाल सलाम, लाल सलाम, शहीद भगतसिंग अमर रहे’च्या जोरदार घोषणा दिल्या.
आडम म्हणाले..
भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ मेळाव्यात उपस्थित युवक व युवतींनी दिलेला उत्फूर्त सहभाग पाहून माजी आमदार नरसय्या आडम यांनी समाधान व्यक्त केले. युवाशक्तीच उद्या राज्याचे चित्र बदलेल, असा विश्वास व्यक्त करीत शोषणमुक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच कोणताही अन्याय सहन न करता त्याचा प्रतिकार करा असेही सांगितले.