आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सवासाठी लोकमंगल नगरी नववधूसारखी नटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - श्रीराम प्रतिष्ठान मंडळ संचलित लोकमंगल जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रांगण युवा महोत्सवानिमित्त एखाद्या नववधूसारखे नटले आहे.

सोलापूर विद्यापीठाचा हा दहावा युवा महोत्सव अविस्मरणीय ठरेल. सेलिबेट्रींची उपस्थिती असेल. नियोजनबद्ध महोत्सव, कलागुणांच्या आविष्कारासाठी सिद्ध झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाहुणचारात कोठेही त्रुटी राहू नये, अशी पुरेपूर काळजी घेतल्याची माहिती स्वागताध्यक्ष रोहन देशमुख यांनी दिली.

मुक्तांजली हा मुख्य रंगमंच 45 बाय 35 फुटांचा आहे. 100 फूट बाय 120 फुटांचा सभामंडप आहे. 1500 प्रेक्षकांची व्यवस्था होऊ शकते. जागोजागी सूचना फलक, कार्यक्रम पत्रिका, स्वागत कमानी आहेत. शनिवारपर्यंत एकूण 65 महाविद्यालयांनी सहभागासाठी नाव नोंदणी केली आहे. उद्या शनिवार उद्घाटनापर्यंत आणखी काही महाविद्यालये सहभागी होतील. शनिवारपर्यंत 1600 विद्यार्थ्यांचा युवा महोत्सव स्पर्धेत सहभाग निश्चित झाला.

शनिवारी सकाळी दहा वाजता सुरुवात होईल. उद्घाटनासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडवणीस, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, लोकमंगल समूहाचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असेल.

विद्यार्थ्यांना भेटवस्तू
युवा महोत्सवातील सहभागाबद्दल सर्वांना लोकमंगल प्रॉडक्टचे खास गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे, साखर, तूप, मसाले यांचा समावेश यात असेल. यंदाच्या युवा महोत्सवाचे हे वैशिष्ट्य़ असेल. यापूर्वी केवळ अकलूजच्या युवा महोत्सवात सहभागींना स्मृतिचिन्ह मिळाले होते.

अशी आहे व्यवस्था
युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पाहुणे म्हणून राजकीय नेत्याला आमंत्रण दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आधीच्या नऊ महोत्सवांचे उद्घाटन कलावंत, साहसवीर यांच्या हस्ते झाले. पण राजकीय नेत्यांच्या हस्ते कधीही झाले नाही. यंदा ते प्रथमच होत आहे. यापूर्वीच्या काही आयोजक संस्था राजकीय नेत्यांच्या असूनही त्यांनी पक्षाचा नेता पाहुणा म्हणून न आणण्याचे संकेत पाळले. लोकमंगल समूहाने 2005मध्ये घेतलेल्या महोत्सवाच्या उद्घाटक अभिनेत्री निशिगंधा वाड होत्या. निवडणुकांचा हंगाम जवळ येत असताना यंदा लोकमंगल समूहाने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना उद्घाटक म्हणून पसंती दिली.

आतापर्यंतचे महोत्सव, आतापर्यंतचे उद्घाटक
पहिला : शिवाजी विद्यालय, नेहरू नगर : चंद्राम चव्हाण गुरुजी
दुसरा : लोकमंगल बायोटेक्नॉलॉजी : अभिनेत्री निशिगंधा वाड
तिसरा : शिवाजी अध्यापक विद्यालय (मोहोळ) : अभिनेता राहुल सोलापूरकर
चौथा : माऊली अध्यापक विद्यालय (वडाळा) : अभिनेत्री शर्वरी जमेनीस
पाचवा : अभियांत्रिकी महाविद्यालय (पंढरपूर) : अभिनेत्री रेशम टिपणीस
सहावा : भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी : अभिनेत्री मेघना डोके
सातवा : सांगोला विज्ञान महाविद्यालय (सांगोला) : कवी अशोक नायगावकर
आठवा : ग्रीन फिंगर्स महाविद्यालय (अकलूज) : अभिनेते सयाजी शिंदे
नववा : भगवंत अभियांत्रिकी (बाश्री) : एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे