सोलापूर - मिनी मंत्रालय अशी आेळख असलेल्या जिल्हा परिषदेतील तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त कर्मचार्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असलेल्या वेतनाचा तिढा गुरुवारी (दि. ८) मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांच्या प्रयत्नांमुळे सुटला. तब्बल पाच हजार कर्मचार्यांचे थकीत वेतन सोमवारपर्यंत वितरित होणार आहे. ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
थकीत वेतनामुळे कर्मचार्यांवर ‘उधार उसनवारी’ करण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेत सुमारे १५ हजार कर्मचारी कार्यरत आहे. त्यामध्ये शिक्षकांची संख्या अधिक आहे. काही विभागांतील कर्मचार्यांचे वेतन झाले. पण, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण, बांधकाम विभागातील तब्बल हजार कर्मचार्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले होते. जिल्हा परिषदच्या अर्थ लेखा विभागतर्फे वेतनाचा धनादेश बँकांकडे पाठवला. पण, वेतनासाठी शासनाकडून निधी मिळाला नसल्याने तो प्रश्न रखडला होता.
गुरुवारी ‘दिव्य मराठी‘मध्ये त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी काकाणी यांनी पुणे विभागीय कार्यालय मंत्रालयात संबंधितांशी चर्चा केल्यानंतर संबंधित वरिष्ठांनी त्वरित वेतनाचा निधी वितरित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायंकाळापर्यंत बांधकाम विभागातील कर्मचार्यांच्या वेतनाचा निधी जमा झाला. इतर विभागांचा निधी दोन दिवसांत जमा होणार असून सोमवारपर्यंत सर्व कर्मचार्यांचे वेतन जमा होईल, असे काकाणी यांनी सांगितले. सायंकाळी कर्मचारी संघटनांनी सीईआेंची भेट घेऊन आभार मानले.