अकोटमध्ये 20 घरे / अकोटमध्ये 20 घरे जाळली; दोन गटांतील किरकोळ वादावरून हिंसाचार

Jun 20,2011 01:42:36 AM IST

अकोला: सायकलस्वाराला दुचाकीची धडक बसल्याच्या कारणावरून अकोट येथे दोन गटांत रविवारी दुपारी तुंबळ हाणामारी झाली. या वेळी जमावाने एकमेकांच्या घरांवर दगडफेक करून आग लावली. त्यात सुमारे 20 घरे भस्मसात झाली. जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात दोन पोलिसांसह आठ जण जखमी झाले. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच हवेत गोळीबार केला.
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास तीन युवक मोटारसायकलवरून जात होते. याचवेळी अशोक प्रल्हाद ताडे व किशोर प्रल्हाद ताडे हे विरुद्ध दिशेने सायकलवरून येत होते. दुचाकीचा सायकलला धक्का लागल्याने या दोन्ही गटांमध्ये वाद झाला, त्यामुळे दुचाकीवरील युवकांनी ताडे बंधूंना बेदम मारहाण केली. या प्रकाराची माहिती गावात कळताच ताडे समर्थक जमा झाले व त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही वेळातच अंजनगाव मार्गावरील धारुली वेस परिसरातील बर्डे प्लॉट, इफ्तेखार प्लॉट, नवदुर्गानगर, नवगजी प्लॉट, रामटेकपुरा, हनुमाननगर, अकबरी प्लॉट परिसरात जातीय दंगल सुरू झाली. अकबरी प्लॉट परिसरातील काही घरांनाही अज्ञात लोकांनी आग लावली, त्यात ही घरे खाक झाली. या आगीत तीन गाई व एक म्हैसही दगावली. यात लक्झरी बस, रिक्षांचीही तोडफोड झाली.X