आमदार राणा विरुध्द / आमदार राणा विरुध्द महापौर शेळके वाद जुंपला

Jun 23,2011 04:49:09 PM IST

अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रवी राणा यांच्यात सुरू असलेला वाद संपण्याचे नाव घेत नाही. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने आता जकातच्या मुद्द्यावर या दोन पक्षांत परत एकदा जुंपली आहे. आमदार रवी राणा यांनी महापौर ऍड. किशोर शेळके यांच्यावर जकातच्या कंत्राटात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्याला महापौरांनी बुधवारी उत्तर दिले आहे. राणांनीदेखील महापौरांवर पलटवार केला.

ऍड. किशोर शेळके म्हणाले की, आमदार रवी राणा यांनी केलेले आरोप केवळ स्वस्तात प्रसिद्धी मिळण्यासाठी केले आहेत. जकातीच्या विषयशी महापौरांचा संबंध येत नाही. स्थायी समिती तसेच प्रशासन त्याबाबतची प्रक्रिया करीत असते. हा नियमदेखील रवी राणा यांना माहीत नसल्याने त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे महापौर ऍड. शेळके म्हणाले. जकातीच्या माध्यमातून महापालिकेला 105 कोटी रुपये मिळू शकतात, असे राणा म्हणत आहेत, त्यांना कोणी थांबविलेले नाही. त्यांच्यात हिंमत असती, तर त्यांनी आधीच जकातीच्या निविदेची प्रक्रिया थांबविली असती, असेही महापौर म्हणाले.

तर राणा यांनी महापौरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. स्वस्त प्रसिद्धी करण्याची मला आवश्‍यकता नाही. शहरात अस्वच्छतेमुळे एका मुलाचा मृत्यू झाला, ही बाब मी महापालिकेच्या लक्षात आणून दिली, ती स्वस्त प्रसिद्धीसाठी होती काय? असा सवाल आमदार रवी राणा यांनी केला. महापालिकेत गेल्या 15 - 16 वर्षांपासून एकच व्यक्ती नाका चालवीत आहे. यात नगरसेवकांचे साटेलोटे नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नाक्‍याच्या प्रक्रियेसाठी महिन्याभराचा कालावधी द्यावा, असा शासनाचा आदेश असताना दहा दिवसांत प्रक्रिया का करण्यात आली? अनुभवाची अट कमी करण्याचे अधिकार स्थायी समिती व महापौरांना आहेत. त्यांनी ही अट काढली, तर 105 कोटी रुपये निश्‍चितच मिळू शकतात, असा आपला दावा असल्याचेदेखील रवी राणा म्हणाले.

X