तीनशे रस्ते, दीडशे / तीनशे रस्ते, दीडशे पूल झाले खिळखिळे !

Jun 18,2011 02:00:09 AM IST

बुलडाणा: सोयीसुविधांच्या बाबतीत कायम मागास असलेल्या विदर्भातील समस्यांकडे राज्य शासनाचे फारसे गांभीर्याने लक्ष नसल्याचा आरोप होत असला तरी मिळालेला निधी विकासकामांवर खर्च करण्यात प्रशासनही अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचाह अनुभव आजवर विदर्भवासीयांना आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे ३०२ रस्ते आणि १४९ पूल नादुरुस्त झाले असून, ते दुरुस्त करण्यासाठी अपेक्षित निधी मिळालेला नाही. जो निधी मिळाला तोही खर्च झाला नसल्याचे दिसून येते.
बुलडाणा जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी एकूण २५ कोटी ५९ लाख रुपयांची मागणी महाराष्टÑ सरकारकडे करण्यात आली होती. दरम्यान, नेहमीप्रमाणेच विदर्भाच्या मागणीला गांभीर्याने न घेता केवळ १ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. आहे त्या रकमेचा तरी योग्य विनियोग व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र, या निधीतून केवळ आठ लाख रुपयेच रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी खर्च झाले आहेत. कुठल्याही जिल्ह्याच्या विकासात त्यांना जोडणाºया रस्त्यांचे महत्त्व अधिक असते. गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते आणि पुलाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे सभापती सुरेश वनोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून रस्ते दुरुस्तीसाठी २५ कोटी ५९ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, सरकारने केवळ १ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला पाठविला. हा निधीही खर्च न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
दरम्यान, खराब झालेल्या काही रस्त्यांवर पावसाळा तोंडावर आला की मलमपट्टी केली जाते. एक- दोन पाऊस पडताच खड्ड्यांमध्ये टाकलेली भर निघून जाते आणि पुन्हा पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’चा अनुभव नागरिकांना येत आहे. या कामात फक्त ठेकेदारांचेच उखळ पांढरे करून आपलीही पोळी भाजून घेण्याचा अधिकाºयांचा प्रयत्न दिसून येतो.

X