निकाल घटलेल्या शाळांच्या / निकाल घटलेल्या शाळांच्या शिक्षकांवर कारवाई

Jun 23,2011 06:43:30 AM IST

चंद्रपूर: सरकार एकीकडे सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असताना सरकारी शाळांमधील शिक्षकांची ‘कार्यक्षमता’ नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालाने समोर आली आहे. अशा शिक्षकांवर कारवाई होणार असून, ज्या शाळांचे दहावीचे निकाल अत्यल्प लागले आहेत तेथील शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ४३० पेक्षा जास्त शाळा असून, यामध्ये ४४ सरकारी शाळांचा समावेश आहे. आताच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालामध्ये सरकारी शाळांच्या निकालाची टक्केवारी 3० टक्यांपेक्षा कमी असल्याचे उघड झाले. जिल्ह्यातील शाळांमध्ये १० आश्रम शाळा तसेच ५ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. यावर्षी राज्य सरकारने कॉपीमुक्त अभियान मोठ्या प्रमाणात राबविल्यामुळे राज्यात सर्वत्र टक्केवारी घटल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्हा शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केल्यामुळे याचा सरळ परिणाम निकालाच्या टक्केवारीवर झाला. या आधी सरकारी तसेच खाजगी शाळांमध्ये कॉपी करण्यास कोणीही थांबवत नसल्याचे चित्र होते. निकाल वाढविण्यासाठी कॉपीबहाद्दरांना शाळा आणि शिक्षकदेखील सढळ हाताने मदत करत होती. याआधी शाळेचे अनुदान, शिक्षकांची वेतनवाढ तसेच आणखी दुसरे भत्ते शाळांच्या निकालाच्या टक्केवारीवर अवलंबून असल्यामुळे शाळा आणि शिक्षक निकाल वाढविण्यासाठी काहीही करायला तयार असायचे. मात्र, यंदा सरकारने कॉपी करणाºयांच्या विरोधात कडक पावले उचलल्यामुळे असे विद्यार्थी आणि शाळांची गोची झाली होती. या सर्वांचा परिणाम म्हणजे ४५० शाळांपैकी केवळ २० शाळांना चांगला निकाल लावण्यात यश मिळाले आहे.

X