नगरमध्ये युवतीवर गोळी झाडली

प्रतिनिधी । नगर | Update - Jun 14, 2011, 02:00 AM IST

प्रकरणी फिर्याद देण्यास तरुणीच्या कुटुंबीयांनी टाळाटाळ केल्यामुळे कौटुंबिक कारणावरूनच हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

 • firing on a girl

  शहरातील गुलमोहर रस्त्यावरील नरहरीनगरमध्ये रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एका युवतीवर गोळी झाडून पलायन केले. या हल्ल्यात नम्रता ठापसे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी फिर्याद देण्यास तरुणीच्या कुटुंबीयांनी टाळाटाळ केल्यामुळे कौटुंबिक कारणावरूनच हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
  रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नम्रता गेट लावण्यासाठी घरातून बाहेर आली असता अज्ञात व्यक्तीने तिच्यावर गोळी झाडून पलायन केले. ही गोळी पोटात लागल्याने नम्रता जागीच कोसळली. फायरिंगचा मोठा आवाज आल्याने तिच्या घरातील मंडळीही तातडीने बाहेर आली. मात्र, त्या ठिकाणी त्यांना कोणीही दिसले नाही; फक्त नम्रता खाली पडलेली होती. आई-वडिलांनी तातडीने नम्रताला रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
  बेपत्ता भावाचा पोलिसांना शोध
  पोलिसांनी घटनेविषयी नम्रताच्या आई-वडिलांकडे विचारपूस केली. मात्र, आम्हाला काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी फिर्याद देण्यासही नम्रताच्या आई-वडिलांनी नकार दिल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कौटुंबिक वादातूनच हा प्रकार घडला असावा किंवा हल्लेखोर माहीत असूनही नम्रताचे नातेवाईक त्याची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत, असा पोलिसांना संशय आहे.
  रविवारी दुपारपर्यंत नम्रता कोणताही जबाब देऊ शकली नाही. दरम्यान, हल्ला झाल्यापासून नम्रताचा भाऊ प्रशांत ठापसे अद्यापही रुग्णालयात फिरकलेला नाही. शोध घेऊन पोलिस त्याचा जबाब मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रकरणी नम्रताच्या कुटुंबीयांनी फिर्याद न दिल्यास पोलिस स्वत:हूनही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास करू शकतात, असे पोलिस निरीक्षक ए. व्ही. पाटील यांनी सांगितले.

Trending